उदय सामंत, उद्याोगमंत्री
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आमच्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण आमच्याकडे आहे. शिवसेनेची विचारधारा आमच्याकडे आहे. या विचारधारेला मानणारा शिवसेनेचा मूळ मतदारही आमच्याकडेच आहे, हे नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला फक्त तीन ते चार जागा मिळतील असे भाकीत करणाऱ्या भल्याभल्यांना आपले शब्द गिळण्यास भाग पाडणारे हे यश शिवसेनेला मिळाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी खोटारडेपणाचा कळस गाठला आणि उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी तुष्टीकरणाच्या काँग्रेसी मंत्राचा प्राणपणाने जप केला, तरीही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या तिसऱ्या विजयी पर्वात शिवसेना पक्षाचे सात खासदारांचे योगदानही महत्त्वाचेच आहे. निवडणुकीपूर्वी मित्र पक्षातील राजकीय सद्भावनेपोटी काही तडजोडी कराव्या लागल्या नसत्या तर शिवसेनेचे आणखी दोन ते तीन खासदार नक्कीच निवडून आले असते, हेसुद्धा मी इथे प्रांजळपणे नमूद करू इच्छितो.
हेही वाचा >>>रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी महाआघाडीतून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला आधीच्या नेतृत्वाबद्दलची नाराजी कारणीभूत होती. लोकसभेच्या प्रचारात उबाठाच्या नेत्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ‘माझा बाप चोरला’, ‘पक्ष चोरला’, ‘खोके’, ‘मिंधे’ अशी विधाने केली. ‘उबाठाच्या नेत्यांनी काहीही विधाने केली तरी आपण आपली पातळी सोडायची नाही, कारण आपल्याला बाळासाहेबांचा, शिवसेनेचा विचार घेऊन पुढे जायचे आहे’ अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. सभ्यपणाची कोणतीही पातळी न सोडता, मित्रपक्षांशी प्रमाणिक राहत शिवसेनेने हे यश मिळवले आहे. उबाठा आणि शिवसेना यांच्यात थेट लढत १३ मतदारसंघात होती, पैकी ७ मतदारसंघात शिवसेनेने बाजी मारली आहे. तर, उबाठाला आमच्यापेक्षा एक जागा कमी मिळाली आहे. लढवलेल्या २१ जागांपैकी ९ जागी विजय मिळविलेल्या उबाठाचा स्ट्राइक रेट ४३ टक्के आहे. तर, १५ पैकी ७ जागा जिंकलेल्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट आहे ४७ टक्के. या १३ जागांवर उबाठाला ६० लाख ३८ हजार ८९१ मतं मिळाली. तर आम्हाला ६२ लाख ६५ हजार ३८४ मतं मिळाली आहेत. उबाठापेक्षा शिवसेनेची मते सव्वादोन लाखांनी जास्त आहेत. त्यांच्या उमेदवारांच्या विजयातील सरासरी मताधिक्य ८६ हजार ९४४ आहे. तर आमच्या उमेदवारांचे सरासरी मताधिक्य १ लाख ६ हजार ९०८ इतके आहे.
मतपेढीच्या राजकारणाने उबाठाला यश
दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही मतदारसंघात उबाठाचे उमेदवार केवळ सात टक्क्यांच्या फरकाने विजयी झालेले आहेत. या दोन्ही मतदारसंघातील मतांची विभागवार आकडेवारी पाहिली आणि उबाठाच्या उमेदवारांना कुणाची मते पडली हे पाहिले तर हा विजय उबाठाचा नसून काँग्रेसी तुष्टीकरणाचा आहे हे लक्षात येईल. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उबाठाचे विजयी उमेदवार अरविंद सावंत यांना आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात केवळ ६७१५ मतांची निसटती आघाडी प्राप्त झालेली आहे. शिवडी या उबाठाच्या आमदार अजय चौधरी यांच्या मतदारसंघातही सावंत यांना केवळ १६,९०० मतांची आघाडी आहे. भायखळा (४६,०६६ मतांची आघाडी) आणि मुंबादेवी (४०,७७९ मतांची आघाडी) विभागातील आघाडीच्या बळावर सावंत विजयी झाले. या मतदारसंघात कुठल्या मतदारांचे प्राबल्य आहे आणि कोणत्या मतपेढीच्या आधारे ते निवडून आले हे जनतेला कळून चुकले आहे. दक्षिण मध्य मुंबईचे चित्रही याहून वेगळे नाही. उबाठाचे अनिल देसाई यांना सर्वाधिक मताधिक्य धारावी (३७,०५७) आणि अणुशक्तीनगर (२९,०८३) या विभागात प्राप्त झाले आहे. घटनाबदलाचा अपप्रचार आणि एका विशिष्ट धर्मीयांच्या मतपेढीचे राजकारण त्यांच्या पथ्यावर पडल्याचेच ही आकडेवारी सांगते.
हेही वाचा >>>बारामतीचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी? ११ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांचं सहावेळा ‘हे’ वक्तव्य
मराठी मतदारांची मोठी संख्या असलेल्या वडाळा आणि माहीम या दोन्ही विभागात उबाठाला कमी मते मिळाली आहेत. दादर हा शिवसेनेचा गड समजला जातो. तिथल्या मतदारांनी धनुष्यबाणाची साथ सोडलेली नाही. याचा अर्थ असा की, या मतदारसंघातील शिवसैनिकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच आणि खऱ्या शिवसेनेच्याच बाजूला आहेत. मुंबईत महाआघाडीपेक्षा महायुतीला जास्त मते मिळालेली आहेत. त्यानंतरही उद्धव ठाकरेंची मुंबईवर पकड असल्याचा निष्कर्ष अनेकांनी फार घाईने काढलेला आहे, हेसुद्धा यावरून लक्षात येते. उद्धव ठाकरे हे आता मराठी माणसाचे नेते राहिले नसून ते अल्पसंख्याकांचे नेतृत्व करत आहेत आणि अशा नेतृत्वाच्या मर्यादा लोकशाहीत आजवर वारंवार दिसून आल्या आहेत.
ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील विजयामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला बालेकिल्ला राखला असाही निष्कर्ष काढण्यात आला. प्रत्यक्षात छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा), बुलढाणा (विदर्भ), मावळ, हातकणंगले (पश्चिम महाराष्ट्र) या भागातही शिवसेनेने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. उमेदवार वेळेत जाहीर झाले असते आणि काही ठिकाणी तडजोड करावी लागली नसती तर आणखी किमान दोन ते तीन मतदारसंघातही निश्चितपणे यश मिळाले असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्याच्या ईर्षेने महाविकास आघाडी झपाटलेली होती. देशाच्या प्रगतीचे, विकासाचे आणि आर्थिक उन्नतीचे स्वप्न पाहाणाऱ्या एका व्यक्तीविषयीचा द्वेष आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यांमधून दिसून येत होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षेएवढे यश मिळू शकले नाही हे खरे आहे. महायुतीमधील एक घटक पक्ष म्हणून त्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच जाहीर केले आहे. राज्यभरातून मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहता महाआघाडीपेक्षा महायुतीला फक्त ०.३० टक्के मतेच कमी मिळालेली आहेत. तसेच, मुंबईत महायुतीला मिळालेली मते ही महाआघाडीपेक्षा सव्वा दोन लाखांनी जास्तच आहेत. मतदारांचा महायुतीवरचा विश्वास कायम असल्याचेही त्यातून स्पष्ट होते.