वाई: राज्यातील सत्तासंघर्षाबाबतचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागताच शिवसेनेकडून साताऱ्यात आनंदोत्सव करण्यात आला. फटाके फोडत, पेढे व साखर वाटण्यात आली. शिवसेना सातारा जिल्हा कार्यालयाबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा होत त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, एकनाथ शिंदे यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.
यावेळी शिवसेना सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे, शिवसेना उपशहरप्रमुख अमोल खुडे, विक्रम यादव, शहर संघटक शुभम भिसे, अमोल इंगोले, किरण कांबळे, ओंकार बर्गे, विभागप्रमुख सयाजी शिंदे, सिद्धेश जाधव, मनोज भोसले, यश खत्री, एझाज काझी, हृषिकेश शिवडावकर, उपविभाग प्रमुख आदित्य यादव, शाखाप्रमुख प्रथमेश बाबर, मनीष मेथा, शुभम मेनकुदळे, ओंकार गायकवाड, अनिकेत भिसे, गणेश शिखरे, साईराज इथापे आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>“पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे असताना नार्वेकरांनी…”, निकालानंतर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा विजय- आमदार महेश शिंदे
आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा झालेला विजय आहे, अशी प्रतिक्रिया आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे.आमदार अपात्रतेवर नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर आनंद व्यक्त करताना शिंदे म्हणाले, की आज लागलेला निकाल म्हणजे हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा झालेला विजय आहे. ज्या पक्षांमध्ये लोकशाहीची प्रक्रिया राबवली जात नाही. त्या लोकांना भारताच्या लोकशाहीवर बोलायचा अधिकार नाही. आजचा निकाल हा निवडणूक आयोगाकडे जी पक्षाची घटना आहे त्या घटनेच्या आधारावर दिला गेलेला निकाल आहे. वारशाने पक्षप्रमुख पद मिळते पण वारशाने कधीही पक्ष चालवता येत नाही. पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मताच्या जीवावर, त्यांच्या विचारांच्या जीवावर चालवला जातो. अशा प्रकारचा सुंदर निकाल आज विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालानंतर शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे आभार मानले आहेत.
शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब – पुरुषोत्तम जाधव
शिवसेना कोणाची यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचे बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी जो निर्णय घेतला त्या विचारांसाठी एल्गार केला. त्या निर्णयाचा आज विजय झाला आहे, असे मत सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर आज जाहीर झालेल्या निर्णयावर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन एकनाथ शिंदे जे काम करत आहेत, त्या विचाराला खऱ्या अर्थाने आज यश आले आहे. संपूर्ण शिवसेना आणि धनुष्यबाण आज आमच्या शिवसेनेचा असल्याचे सिद्ध झाले आहे. संपूर्ण देशभरात शिवसेनेचा प्राबल्य वाढलेले दिसेल. येणाऱ्या निवडणुकीतही शिवसेना काय आहे, हे सिद्ध होईल. त्यामुळे रोज उठसुट याविषयी मत व्यक्त करणाऱ्यांना कायद्याने चपराक मिळाली आहे.