शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय हे ठाण्यात असणार आहे हे स्पष्ट झालं आहे. एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सचिव संजय मोरे यांनी एक पत्रक काढलं आहे. या पत्रकात आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना न म्हणता शिवसेना म्हणा असं नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकावर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता आनंद आश्रम ठाणे असा आहे. आनंद आश्रम हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं निवासस्थान आहे. याच ठिकाणी शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय आहे हे आता या पत्रकावरून स्पष्ट झालं आहे.
संजय मोरे यांनी काढलेल्या पत्रकात काय?
मंगळवारी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एक पत्रक काढलं. ज्यात बाळासाहेबांची शिवसेना ऐवजी आमचा उल्लेख शिवसेना असा करावा हे नमूद करण्यात आलं आहे. हे पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आलं असून त्यावर पत्ता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, आनंद आश्रम ठाणे असा आहे. आत्तापर्यंत शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय दादरचं शिवसेना भवन होतं. मात्र आता संजय मोरे यांनी काढलेल्या पत्रकावर शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, आनंद आश्रम, ठाणे असा उल्लेख आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा मोठा बदल झाला आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयातून म्हणजेच आनंद आश्रममधूनच शिवसेनेचा कारभार पाहतील असंच दिसतं आहे.
शिवसेना भवन कधी उभं राहिलं?
शिवसेना स्थापनेनंतर दहा वर्षानंतर सेनेला हक्काचं ठिकाण मिळालं. देशातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक इथं यायचा आपली भावना मांडायचा आणि त्याला जितका विश्वास बाळासाहेबांवर होता. तितकाच विश्वास शिवसेना भवनाविषयी होता. मुंबईतील दादर येथे असणारं शिवसेना भवन हे कार्यालय उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. कारण हे कार्यालय शिवाई नावाच्या ट्रस्टच्या नावावर आहे. त्याचे अध्यक्ष लीलाधर ढाके आहेत. तसेच, शिवसेनेचं मुखपत्र असणारं दैनिक सामना, मार्मिक साप्ताहिक या प्रबोधन प्रकाशन या पब्लिक लिमिटेड संस्थेचं असल्यामुळे याचीही मालकीही ठाकरे गटाकडेच असणार आहे.
आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही
एकनाथ शिंदेंसोबत गेलेले शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनीही माध्यमांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली की आम्ही शिवसेना भवनावर आमचा हक्क सांगणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना भवन उभारलं आहे. हे शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. त्यामुळे त्यावर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर आता संजय मोरे यांनी दिलेल्या पत्रावर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता हा आनंद आश्रम, ठाणे असा देण्यात आला आहे. त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.