शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने पत्रही उमेदवारीच्या रामरगाडय़ात बेदखल ठरविण्याइतपत असंवेदनशीलपणा शिवसेनेत दाखवण्यात आल्याचे महापालिका निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरून पुढे आले आहे. १९९०च्या ऑगस्ट महिन्यात शहरातील गारखेडा परिसरात पडलेल्या एका दरोडय़ात पुंडलिक राऊत यांची हत्या झाली. ते धाडसाने दरोडेखोरांना सामोरे गेले होते. त्या शिवसैनिकाच्या कुटुंबाची काळजी घ्या, असा संदेश असणारे पत्र तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाचे आमदार चंद्रकांत खैरे यांना लिहिले होते. त्या शिवसैनिकाची पत्नी वत्सलादेवी पुंडलिक राऊत यांनी या वेळी शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागितली होती. ती शिवसेनेने नाकारली. कारण न देता नाकारलेल्या या उमेदवारीचा आणि नेत्यांनी दिलेल्या नातलगांच्या उमेदवारीवरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खासदार चंद्रकांत खैरे व आमदार संजय शिरसाट या दोघांनी आपापल्या मुलांना उमेदवारी दिली. बाळासाहेबांच्या त्या पत्राचे स्मरण करून देऊनही हाती काहीच लागले नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
शिवसेनेत मागील २५ वर्षांपासून कार्य करणाऱ्या वत्सलादेवी राऊत यांनी १९९५ ते २०१५पर्यंत दरवेळी शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, या साठी अर्ज केले. पक्षसंघटनेत काम करूनही आणि ‘सच्चा शिवसैनिक’ असे वर्णन करून ज्यांना बाळासाहेबांनी पत्र दिले होते, त्या राऊत यांच्या पत्नीला उमेदवारी दिली नाही वा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘सन्मान’ही केला नाही, असे पत्र लिहून कळविल्यानंतरही दखल घेतली गेली नाही.
ज्या भागातून उमेदवारी मागितली, त्या भागाचे नाव पुंडलिकनगर आहे. दरोडय़ाच्या त्या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी १९९० मध्ये पुंडलिक राऊत यांच्या स्मरणार्थ पुंडलिकनगर असे या भागाचे नामकरण केले. उमेदवारी नाकारल्याने व्यथित झालेल्या वत्सलादेवी राऊत म्हणाल्या की, आता बाळासाहेबच नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचाराने चालणारे शिवसैनिक तरी राहिले आहेत की नाहीत, अशी शंका येऊ लागली आहे. किमान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तरी त्या पत्राची दखल घेतील, असे वाटत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा