शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह छातीवर लावून मतदान केंद्राच्या आवारात येणाऱ्या मतदारांशी हुज्जत घातल्या प्रकरणी त्यांच्यासह तिघांविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
मतदान सुरू झाल्यानंतर तासाभरातच म्हणजे सकाळी ८ वाजताच लोणी बुद्रुक (तालुका राहाता) येथे हा प्रकार घडला. मिर्लेकर (वय ५०, रा. गिरगाव, मुंबई) यांच्यासह प्रवीण एकनाथ जाधव (वय ४२), पवन दिलीप जाधव (वय २८, दोघेही राहणार मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) या तिघाविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिर्लेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील अहल्याबाई होळकर विद्यालयाच्या मतदान केंद्रासमोरील आवारात अनधिकृतपणे येऊन मतदानास येणाऱ्या लोकांशी हुज्जत घालून मतदारांमध्ये गैरवाजवी प्रभुत्व निर्माण केले. या वेळी त्यांच्या छातीला पक्षाचे चिन्हही लावलेले होते हा आचारसंहितेचा भंग आहे. पोलीस हवालदार व्ही. डी. माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील गुन्हा लोणी पोलिसांनी दाखल केला आहे. पोलिसांनी मिर्लेकर व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करून त्यांची तात्काळ जामिनावर मुक्तता करण्यात केली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शारीरिक बळाचा वापर करून मिर्लेकर यांना मतदान केंद्राच्या आवाराबाहेर नेले. येथे त्यांची काही लोकांशीही झटापट झाल्याचे समजते, मात्र मिर्लेकर यांनी याबाबत कोणतीही तक्रार दाखल केली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा