दहशतवाद रोखणारी ‘छाती’ असतानाही पुलवामा घडले असा हल्लाबोल शिवसेना मुखपत्र सामनातून केला आहे. सोमवारी शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीनंतर सामनाच्या पहिल्याच आग्रलेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. भाजपाशिवाय सिद्धू यांचा उल्लेख बेलगाम बोलणारा माणूस असा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी आज विद्यमान पंतप्रधानांची आहे, असे कुणी म्हटले तर ते समजून घेतले पाहिजे. पुण्यातील नक्षलवाद्यांकडून पंतप्रधानांच्या जिवास धोका असल्याचा ‘ई-मेल’ आमचे गुप्तचर पकडतात व पंतप्रधानांचा जीव वाचवतात, पण चाळीस जवानांना घेऊन जाणार्‍या बसवर दिवसाढवळ्या हल्ला होणार याची खबर लागत नाही. दहशतवाद रोखणारी ‘छाती’ असूनही पठाणकोटनंतर उरी घडले व उरीनंतर आता पुलवामा घडले. पंतप्रधानांसह इतर व्ही.आय.पी. मंडळींच्या सुरक्षेची चिंता केली जाते, पण जवान मात्र अतिरेक्यांच्या हल्ल्यात मरण पावतात. असे काही प्रश्न शिवसेना मुखपत्र सामनामध्ये उपस्थित केले आहेत.

एखादा दहशतवादी हल्ला झाल्याशिवाय आमच्या देशभक्तीस जाग येत नाही. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी असे हल्ले होण्याची वाट का पाहावी लागते? हे काम कधीच व्हायला हवे होते. आता ‘पुलवामा’ हल्ल्यानंतर तरी विद्यमान सरकारने पाकिस्तानला धडा शिकविण्याचे कर्तव्य पार पाडावे ही जनभावना आहे. यात थोडाफार राजकीय रागरंग मिसळला जातोच. मात्र एखाद्याच्या देशभक्तीपेक्षा दुसर्‍याची देशभक्ती प्रखर यावर सोशल मीडियात स्पर्धा होऊ नये.

‘पुलवामा’ घटनेचे राजकारण होऊ नये. ४० जवानांच्या हौतात्म्यानंतर देशात आकांत, आक्रोश आणि संतापाचे वातावरण आहेच. तरीही राजकीय सभांत प्रचारकी भाषणे त्याच वेळी कोणी करीत असतील तर त्यावर टीका होणारच. ही देशभक्ती खचितच नव्हे. निवडणुकीपूर्वी एखादा दहशतवादी हल्ला होईल व त्यानंतर एखादे छोटे युद्ध खेळून निवडणुका जिंकल्या जातील, असा राजकीय आरोप काही दिवसांपूर्वीच झाला. अशा आरोपांना पुष्टी मिळेल असे वर्तन राज्यकर्त्यांनी करू नये. लोकांच्या मनातील खदखद लाव्हारसाप्रमाणे उसळून बाहेर येईल व त्यांना आवरणे कठीण जाईल. दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये. तसे कोणी करीत असेल तर ईश्वर त्या सर्वच राजकीय पक्षांना सुबुद्धी देवो! असे सामनामध्ये म्हटले आहे.