कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे. राज्यगीतावेळी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र यावरून शिवसेनेने(ठाकरे गट) शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“दिल्लीदरबारी महाराष्ट्राचा पावलोपावली अपमान होत असताना अपमानित राज्य सरकारने महाराष्ट्राला राज्यगीत दिले आहे. देशाला ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आहे. तसे महाराष्ट्रासाठी स्वतंत्र असे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. एका बाजूला राज्यगीताची घोषणा झाली व दुसऱ्या बाजूला केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. त्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या नशिबी रिकामी खोकाच आला. मुंबईलाही भोपळाच मिळाला. या गीताचे जनक ज्येष्ठ कवी राजा बढे आहेत आणि ते गायले आहे शाहीर साबळे यांनी. त्यांच्या या महाराष्ट्र गीताने महाराष्ट्राला जाग आणण्याचे काम नेहमीच केले. महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, वैभव, शौर्य, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक वारशांचा अभिमान या गीतांतील शब्दाशब्दात ठासून भरला आहे. महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले, पण सध्या दिल्लीच्या तख्ताने महाराष्ट्राच्या सन्मानाचा, विकासाचा गळा घोटण्याचा जो चंग बांधला आहे त्याचे काय?” असा सवाल सामनाच्या अग्रलेखाद्वारे करण्यात आला आहे.”

मिंधे सरकारची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट व्हायला हवे –

याशिवाय, “महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल, पण आम्ही मात्र लाचार बनून दिल्लीचे खूर चाटत राहू असे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे व त्यामुळेच की काय, या महाराष्ट्र गीतातील तिसरे कडवे गाळले असून महाराष्ट्राच्या नशिबी अर्धेअधुरे राज्यगीत आल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राचे राज्यगीत घोषित करताना तिसऱ्या कडव्यातील महत्त्वाचा ‘एल्गार’ वगळला आहे; कारण त्यात ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ हा उल्लेख आहे व सध्याच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांना हा उल्लेख अजिबात आवडणार नाही! तेव्हा या गीतातील हे कडवे वगळले आहे काय? व वगळले असेल तर त्यामागची मिंधे सरकारची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट व्हायला हवे.” अशी मागणीही करण्यात आली आहे.

“निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा!”असे हे कडवे म्हणजे महाराष्ट्र गीताचा ज्वलंत आत्मा व खरी गर्जना आहे. हा आत्माच वगळला व गर्जनाच दाबली तर उरले काय? त्यामुळे सरकारने याबाबतीत सत्य काय ते समोर आणायला हवं. असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र म्हणजे देशाची ढाल–तलवार हे सत्य आहेच! –

याचबरोबर, “दिल्लीचे तख्त मग ते कोणत्याही बाद–शहांचे असो, त्याने नेहमीच महाराष्ट्राशी वैर धरले. महाराष्ट्राचा स्वाभिमान या सर्व शाहय़ांना बाणासारखा टोचत राहिला. मोडेन पण वाकणार नाही हा मराठी माणसाचा बाणा त्यांना सलत राहिला. पण दिल्लीस मान्य नाही म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतातील तिसरे कडवे वगळून महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या चरणी अर्पण करणे कितपत योग्य आहे? म्हणूनच राज्यात सरकार भले मिध्यांचे असेल, पण महाराष्ट्र गीतातील तिसऱ्या कडव्यातील दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र आज राहिला आहे की नाही हे स्पष्ट व्हायलाच हवे. कुणाला आवडो वा ना आवडो, महाराष्ट्र म्हणजे देशाची ढाल–तलवार हे सत्य आहेच! दिल्लीकरांनाही ते मान्य करावेच लागेल.” अशा शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena criticizes shinde fadnavis government for removing third stanza from jai jai maharashtra state anthem msr