शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची विरोधकांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतरही आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कर्जमुक्तीची मागणी रेटत भाजपची कोंडी केली आहे. युतीचे सरकार असूनही  सेनेने अनेकदा सरकारी धोरणांनाच लक्ष्य केले आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे यावरून सध्या विरोधी पक्षांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांच्या या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा मंगळवारी स्पष्ट झाला. शेतकऱ्यांना कर्जमाफीच नव्हे तर कर्जमुक्ती मिळावी ही आमची पूर्वापार मागणी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
ध्वजारोहण सोहळ्याद्वारे सिंहस्थ कुंभमेळ्यास मंगळवारी सुरुवात झाली. भाजपचे केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांसह इतरही मंत्र्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यापासून अंतर राखून राहिलेले ठाकरे यांनी मानपानापासून आपणास दूर राहायचे असल्याचा टोला लगावला. भाजप व शिवसेनेमध्ये कोणताही दुरावा नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. पुरोहित संघातर्फे गोदावरी काठावर आयोजिलेल्या कार्यक्रमास ठाकरे हे शहरात असूनही उपस्थित राहिले नाहीत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातसह आसपासच्या राज्यांमध्ये जात असल्याच्या प्रश्नावर सध्या अस्तित्वात असणारे आणि नव्याने येऊ घातलेले उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ दिले जाणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.