१६ आमदार अपात्र प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दरबारी प्रलंबित आहे. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालायने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केलं. आज या प्रकरणावर तिसरी सुनावणी सह्याद्री येथे पार पडली. यावेळी सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी दिली आहे. सुनावणी संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“आज तीन तास दोन्ही वकिलांचा युक्तीवाद झाला. आता यावर २० तारखेला निर्णय देण्यात येणार आहेत. तसंच, ठाकरे गटाकडून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी केली जातेय. परंतु, या सर्व याचिका म्हणजे वेगवेगळे मुद्दे आहेत. वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे या सर्व याचिका एकत्र करून त्यावर सुनावणी घेणं कायद्याने योग्य नाही, असा आमच्याकडून युक्तीवाद करण्यात आला आहे”, असं शिंदे गटाचे वकील म्हणाले.
“बैठकींना हजर न राहणं, अध्यक्ष निवडीचा व्हीप न पाळणं, बहुमत सिद्ध करताना व्हीप न पाळणं या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे, त्या प्रत्येक आमदाराला बाजू मांडण्याचा अधिकार आहे. या सर्व याचिका एकत्र केल्यास तो अधिकार राहणार नाही”, असंही शिंदे गटाचे वकील म्हणाले.
“अध्यक्षांना आम्ही विनंती केली आहे की लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील”, असंही शिंदे गटाचे वकील म्हणाले.