तौक्ते वादळात महाविकास आघाडी सरकारने मदतीची घोषणा केली, पण अद्यापही मदत केलेली नाही. मत्स्य व्यवसायाला मत्स्यशेती म्हणून व मच्छीमार ‘शेतकरी’ म्हणून मान्यता दिल्यास त्यांना पीक कर्ज व शेतकऱ्यांच्या सुविधा, सवलती मिळतील. मच्छीमारांना दिलासा मिळेल, यादृष्टीने राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
तौक्ते चक्रिवादळाचा फटका बसलेल्या पालघर जिल्ह्यातील कोळीबांधवाना पुन्हा उभे करण्यासाठी कोळी महासंघाचे अध्यक्ष व भाजप आमदार रमेश पाटील यांच्या पुढाकाराने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेकांना आर्थिक मदत, सातपाटी गावाकरिता रुग्णवाहिका, एडवण गावाकरिता कुपनलिकांसाठी निधीचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेने कोळी बांधवांना वाऱ्यावर सोडले
यावेळी प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली. “मच्छीमार समाजाने नहेमीच शिवसेनेला निवडणुकांमध्ये भरभरून मतं दिली. या समाजाने शिवसेनेच्या पालख्या वाहिल्या. मात्र शिवसेनेने याच कोळी बांधवांना वाऱ्यावर सोडले. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेला मच्छीमार बांधवांचा विसर पडला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आजही मच्छीमारांना मदत मिळत नाही, त्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत यासारखे दुर्दैव नाही,” असे दरेकर म्हणाले.
हेही वाचा- फडणवीसांच्या निवेदनानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले…
सरकारकडे मच्छीमार समाजासाठी वेळ नाही
“देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना मच्छीमार समाजासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो व त्यांच्या समस्या सोडवल्या परंतु महाविकास आघाडी सरकारकडे मच्छीमार समाजासाठी वेळ नाही. महाविकास आघाडीमध्ये सरूअसलेल्या कुरघोडी निस्तरण्यातच त्यांचा वेळ जात आहे. राज्य सरकारला जनतेशी व त्यांच्या प्रश्नांशी काही घेण देणं नाही आहे”, असा टोला दरेकर यांनी लगावला.