Eknath Shinde Shiv Sena: महायुती सरकारचा शपथविधी झाल्यापासून शिवसेना (शिंदे) पक्ष आणि भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहे. बहुमत असतानाही शपथविधीसाठी लागलेला उशीर आणि त्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून झालेले नाराजीनाट्य, यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचेच चित्र दिसले. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. महायुतीमधील अंतर्गत राजकारणाचा पुढचा अंक आता पाहायला मिळत आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना एक नवी जबाबदारी दिली आहे.
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) ज्या ज्या जिल्ह्यात पालकमंत्री आहेत, त्या त्या जिल्ह्यांसाठी शिवसेनेने संपर्क मंत्री नेमले आहेत. महायुती किंवा आघाडीच्या सरकारमध्ये पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्क मंत्री नेमण्याची पद्धत जुनीच असली तरी एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेण्यासाठी जे टायमिंग साधले, त्याची चर्चा आता होताना दिसत आहे. आजच (४ मार्च) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदावरही टांगती तलवार आहे.
शिवसेनेच्या एक्स हँडलवर शिवसेनेच्या ११ मंत्र्यांना एकूण २३ जिल्ह्यांची जबाबदारी दिली असल्याची यादी पोस्ट करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पालक मंत्री आहेत. मंत्री उदय सामंत, संजय राठोड यांच्याकडे प्रत्येकी तीन जिल्हे तर आठ मंत्र्यांकडे प्रत्येकी दोन जिल्हे दिले आहेत. तर राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे एकच जिल्हा दिला आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सन्माननीय मंत्री महोदयांना शिवसेना पक्ष वाढीसाठी खालील नमूद केलेल्या जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात येत आहे.#Shivsena #maharashtra #EknathShinde… pic.twitter.com/K1pyjdHZsh
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) March 4, 2025
विशेष म्हणजे, ५ फेब्रुवारी रोजी भाजपानेही आपल्या संपर्क मंत्र्यांची यादी जाहिर केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही आपल्या संपर्क मंत्र्यांची घोषणा केली.
सर्व काही ठंडा ठंडा, कूल कूल – शिंदे
राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये भाजपा आणि शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील नेत्यामध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा असताना एकनाथ शिंदे यांनी १८ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी संवाद साधताना, महायुतीत कोणतंही कुरघोडीचे राजकारण सुरु नसल्याचे स्पष्टीकरण शिंदेंनी दिले होते. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे (एकनाथ शिंदे) संबंध ठंडा ठंडा, कूल कूल आहेत’, अशी मिश्किल प्रतिक्रियाही शिंदेंनी दिली होती आणि महायुतीत अंतर्गत कलहाचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.
जिल्हा | भाजपा-राष्ट्रवादीचे पालकमंत्री | शिवसेना (शिंदे) पक्षाचे पालकमंत्री |
परभणी | मेघना बोर्डीकर (भाजपा) | गुलाबराव पाटील |
बुलढाणा | मकरंद जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) | गुलाबराव पाटील |
मुंबई उपनगर | ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (भाजपा) | उदय सामंत |
पुणे | अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) | उदय सामंत |
सिंधुदुर्ग | नितेश राणे (भाजपा) | उदय सामंत |
सांगली | चंद्रकांत पाटील (भाजपा) | शंभुराज देसाई |
अहिल्यानगर | राधाकृष्ण विखे-पाटील (भाजपा) | शंभुराज देसाई |
नागपूर | चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा) | संजय राठोड |
अमरावती | चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा) | संजय राठोड |
चंद्रपूर | अशोक उईके (भाजपा) | संजय राठोड |
धुळे | जयकुमार रावल (भाजपा) | दादा भुसे |
नंदुरबार | माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) | दादा भुसे |
पालघर | गणेश नाईक (भाजपा) | प्रताप सरनाईक |
सोलापूर | जयकुमार गोरे (भाजपा) | प्रताप सरनाईक |
हिंगोली | नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी) | भरत गोगावले |
वाशिम | हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) | भरत गोगावले |
बीड | अजित पवार (राष्ट्रवादी) | संजय शिरसाट |
नांदेड | अतुल सावे (भाजपा) | संजय शिरसाट |
अकोला | आकाश फुंडकर (भाजपा) | प्रकाश आबिटकर (लातूर) |
लातूर | शिवेंद्रसिंह भोसले (भाजपा) | प्रकाश आबिटकर (लातूर) |
भंडारा | संजय सावकारे (भाजपा) | आशिष जैस्वाल |
गोंदिया | बाबासाहेब पाटील (भाजपा) | आशिष जैस्वाल |
जालना | पंकजा मुंडे (भाजपा) | योगेश कदम |
प्रादेशिक पक्ष संपविण्याचा भाजपावर आरोप
भाजपा आपल्या मित्रपक्षांना संपवतो, असा एक जुना आरोप विरोधक करत असतात. देशभरात ज्या ज्या राज्यातील प्रादेशिक पक्षांशी भाजपाने युती केली. त्यांचे उदाहरण दिले जाते. महाराष्ट्रातही अनेक वर्ष संयुक्त शिवसेनेशी भाजपाची युती होती. मात्र २०१९ साली महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यानंतर २०२२ साली शिवसेना आणि २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. २०२४ च्या निकालानंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यानंतर घडलेल्या घडामोडी या महायुतीमध्ये सूप्त संघर्ष असल्याच्या द्योतक होत्या.