Shiv Sena Vs Atul Save : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. महायुतीमध्ये आधी मंत्रिपदे, नंतर खातेवाटप आणि आता पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी भाजपा-शिवसेना (एकनाथ शिंदे), काही ठिकाणी भाजपा-राष्ट्रवादी (अजित पवार) तर काही ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार)-शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री पालकमंत्रीपदावर दावे ठोकत आहेत. अशात आता, यापूर्वी जालन्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेल्या अतुल सावे यांना यावेळी जालन्याचे पालकमंत्रीपद देण्यास शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी विरोध केला आहे.

काय म्हणाले शिवसेना जिल्हाप्रमुख?

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे म्हणाले, “पालकमंत्री कोणाला करायचे हा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचा आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये शेजारचा जिल्हा म्हणून अतुल सावे यांना जालन्याचे पालकत्व दिले होते. पण अतुल सावे यांनी या काळात शिवसेना असो भाजपा असो की राष्ट्रवादी, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतले नाही. त्यामुळे सर्वांचा रोष आहे. आमच्या सर्वांची मागणी आहे की, अतुल सावे सोडून कोणालाही जालन्याचे पालकमंत्री करावे. जर या मंत्रिमंडळात अर्जुन खोतकर, नारायण कुचे, बबनराव लोणीकर किंवा संतोष दानवे असते तर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला असता.”

पुढे बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले, “गेल्या सरकारच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली. याबाबत अतुल सावे यांना कळवले, पण त्यांनी ढुंकूनही याकडे पाहिले नाही. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. या जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभे केले होते. त्याकडेही ते फिरकले नाही. जरांगे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत, विधानही भरसभेत केले होते.”

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत अतुल सावेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तो निर्णय आम्हाला मान्य असेल”

संभाजीनगरसाठीही रस्सीखेच

यापूर्वी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यामध्ये संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. संजय शिरसाट यांनी, “छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार, पण यासंदर्भातील औपचारीक घोषणा बाकी आहे”, असे म्हटले होते.

यावर बोलताना अतुल सावे यांनी, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल”, असे म्हटले होते.

Story img Loader