उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली अडीच वर्षांनंतर दिल्लीत जाऊन काम करायचे होते, त्यांना अर्थ विभागात रस होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील सभेत या दाव्यावर पलटवार केला. तसेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्याची भाषा वापरताना त्यांना (उद्धव ठाकरेंना) वेड लागले असेल, पण मला वेड लागलेले नाही, असेही फडणवीस म्हणाले होते. यावर आता शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. “प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की, मी वेडा नाही. प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की, मी गुन्हा केला नाही. हा मानवी स्वभाव असतो. फडणवीस याला अपवाद नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले.
मोदी-शाहांनी फडणवीसांच्या स्वप्नांचे पंख कापले
“उद्धव ठाकरे यांनी जे सागंतिले ते शंभर टक्के सत्य आहे. उद्धव ठाकरेंशी फडणवीसांची चर्चा झाली तेव्हा आमचे संबंध चांगले होते. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मी दिल्लीत जाऊन मी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान होईल, असे त्यांचे स्वप्न होते. स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठिशी उभे राहतो. पण त्यांचे हे स्वप्न बहुधा मोदी-शाहांना आवडले नाही. म्हणूनच फडणवीस यांच्या स्वप्नांचे पंख कापण्यात आले आणि त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री करण्यात आले. जे काही राजकारण आम्हाला कळते, त्यातून हे दिसते”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
इतके मोठे स्वप्न फडणवीस पाहायला लागल्यानंतर मोदी-शाहांनी निर्णय घेऊन एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली त्यांना काम करायला लावले. यालाच मोदी-शाहांची रणनीती म्हणतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
नाना पटोलेंना फार कळत नाही
उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा होऊ शकतात, असे विधान संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. आज पत्रकार परिषदेत या विधानावर त्यांची भूमिका काय? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी ३०० हून अधिक जागा मिळवणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला जाईल. जेव्हा मला उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याबद्दल विचारण्यात आला तेव्हा मी त्याला सकारात्मक उत्तर दिले. पण इंडिया आघाडीत आणखीही नेते आहेत. इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. देशभरात राज्य पातळीवरही अनेक नेते आहेत. नेतृत्व कुणाचे असेल हा प्रश्न आज आमच्यासमोर नाही. आमची लढाई हुकूमशाहीविरोधात आहे.”
“त्यांना केंद्रात जाऊन…”, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाऊन काय करायचं होतं? उद्धव ठाकरे म्हणाले…
नाना पटोलेंवर जास्त लक्ष देऊ नका
उद्धव ठाकरेंचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यालाही संजय राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “नाना पटोले यांच्या विधानावर लक्ष देण्याची गरज नाही. आमचा संपर्क थेट राहुल गांधींशी आहे. आम्ही काय बोलतो, ते काँग्रेसला समजत नाही. राहुल गांधी देशाचे नेते आहेत, ते पंतप्रधान बनू इच्छित असतील तर त्यांचे स्वागत आहेच. पण इंडिया आघाडीत आणखीही महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे नाव घेणे चुकीचे नाही. यामुळे कुणालाही मिरची लागण्याची गरज नाही.”