Uddhav Thackeray on Nagpur Violence: औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी महाराष्ट्रात काही दिवसांपासून होत आहे. नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी काही संघटनांनी निदर्शने केली. मात्र या मुद्द्यावरून नागपूरमध्ये सोमवारी रात्री (१७ मार्च) हिंसाचार उसळला. यावर आता महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शिवसेनेचे (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात माध्यमांशी बोलत असताना महायुती सरकारवर जोरदार टीका केली. भाजपा घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, माजी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. पण दुसऱ्या बाजूला त्यांना सोडून औरंगजेबावरून इथल्या लोकांमध्ये दंगली लावल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते, असे विधान भाजपाच्या खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत केले. याचाही ठाकरेंनी निषेध केला. भाजपाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ऐऱ्यागैऱ्याशी करतात, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या एकाला तरी भरचौकात फटकवला तर पुढे असले प्रकार होणार नाहीत, असेही ते म्हणाले.

गुजरातमध्ये जन्मलेल्या औरंगजेबाची कबर उखडून टाका

नागपूर दंगलीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “गुजरातमध्ये जन्माला आलेल्या औरंगजेबाविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून त्याला नमवत हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब त्या स्वराज्यावर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता. पण तो महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही. महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराराणी आणि असंख्य मावळ्यांनी स्वराज्याचा लढा सुरू ठेवला. थोडक्यात काय तर गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्राची माती जिंकू शकला नाही. पण महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचे समर्थन कुणीही शिवप्रेमी करणार नाही.”

“जे लोक औरंगजेबाचे थडगे उखडून टाकण्याची भाषा वापरत असेल तर त्यांनी नुसते आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार नुसती वाफ सोडण्यासाठी आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबर नष्ट करण्यासाठी असमर्थतता दाखवली असून त्याला केंद्राचे संरक्षण आहे. म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर आम्ही भाजपाला विचारतो की, औरंगजेब तुमचा कोण लागतो?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

औरंगजेब, अफजल खान पराक्रमाचे पुरावे

औरंगजेब असो किंवा अफजल खान असो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना नष्ट करावे वाटत असेल तर आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी पंतप्रधान मोदींकडे जावे. पंतप्रधान मोदींनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत औरंगजेबाची कबर उध्वस्त करावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

गृहखाते झोपा काढत होते का?

नागपूरमध्ये उसळलेली दंगल पूर्वनियोजित होती, असे सरकारने सांगितले असल्याचा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह नागपूरमध्ये आहे. संघाचे मुख्यालयही तिथेच आहे. मग नागपूरमध्ये ‘हिंदू खतरे मे’, कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही काय केले? दंगल पूर्वनियोजित असेल तर तुमचे गृहखाते झोपा काढत होते का? हा कट शिजतोय, हे गृहखात्याच्या कानावर आले असेल तर त्यांनी दुर्लक्ष केले का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात.

“सरकार आपले अपयश लपविण्यासाठी इतर मुद्दे उपस्थित करत आहे. त्यात ते आणखी अपयशी ठरत आहेत. भाजपाचे हिंदुत्वाचे ढोंग आम्ही पाहिलेले आहे. त्यांना हिरव्या रंगाचा इतका राग असेल तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या झेंड्यावरील हिरवा रंग काढून दाखवावा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. एकाबाजूला हिंदुत्व हिंदुत्व करायचे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा सामना खेळायचा. मग दुबईतला सामना यांची पोरंटोरं जाऊन बघणार. म्हणजे मंत्र्यांची मुले दुबईत जाऊन सामने पाहणार आणि इथे गरीबांची मुले हिंदुस्तान-पाकिस्तान म्हणून लढवत बसवायचे, हे कोणते हिंदुत्व?”, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.