अभिनेत्री कंगना रणौतने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं आहे. ‘‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, असं कंगना रणौत म्हणाली होती. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या व वादंग निर्माण झाला. आता कंगनाच्या या वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केल्याने नव्या वादाला सुरूवात झाली आहे. शिवसेनेने विक्रम गोखले यांचे वक्तव्य दुर्दैव असल्याचे म्हटले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले, “हा विक्षिप्तपणा आहे. विक्रम गोखले यांच्यासारख्या सुज्ञ कलावंतानी असे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. देशाचं स्वतंत्र हे भीक असेल तर गेली ७५ वर्षे ते भीक साजरी करतात का?. तसेच यंदाही ७५ वर्षे कशासाठी साजरे करता. कंगनाच्या म्हटल्याप्रमाणे साडेसात वर्षे साजरे करा. ७५ च्या जागी ७.५ स्वतंत्र्याचे वर्ष साजरे करा. म्हणजे आम्हाला कळेल कंगना योग्य आहे.”

विक्रम गोखले यांनी राज्याच्या राजकारणावर देखील भाष्य केलं आहे. भाजपा शिवसेना एकत्र आले तर बरं होईल. युतीच्या मध्यस्थीसाठी मी तयार असल्याचे गोखले म्हणाले, यावर अरविंद सावंत म्हणाले, “कुणाला स्वप्न पाहायचे असतील तर पाहूद्या. २०१४ ला युती कोणी तोडली होती. २०१९ ला कोणी शब्द पाळला नाही. हे सगळे विषय विक्रम गोखलेंना काय माहित असणार.”

स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंकडून समर्थन; म्हणाले…

काय म्हणाले विक्रम गोखले?

कंगना रणौतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विक्रम गोखले म्हणाले, “खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, ते की ते भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी.”

तसेच, “ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा हा अवमान नाही का? असं प्रश्न विचारला गेला असता विक्रम गोखले म्हणाले, आहेच, पण हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. आपण म्हणजे कोण आपण सरकार देतो. हा आपला अधिकार आहे. आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे, की तुम्ही हे काय करत आहात? मी तर म्हणेण की यापुढे होणार कुठलाही मोठा खर्च त्याबद्दलचं ऑडीट हे जनतेला माहिती असलं पाहिजे, की आम्ही पैसे भरतो आहोत. आम्ही देशातून पैसा चोरून बाहेर स्वीस बँकेत नेवून ठेवत नाही. कर भरतो हा सामान्य माणूस कर भरतोय त्याचा प्रत्येक ठिकाणी हक्क आहे. त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या पैशांचं काय करत आहात? कंगनाच्या विधानाशी सहमत आहे, भीक मागूनच मिळालेलं आहे ते. मतपेटीचं राजकारण सुरू झाल्यापासून वादला काही कमी नाही. कुठल्याही अगदी फडतूस कारणावरून वाद निर्माण होतात. यामध्ये सगळे आले, एकही पक्ष असा नाही की जो वादात पडत नाही.” असंही यावेळी विक्रम गोखले यांनी बोलून दाखवलं.

“ लोकांची फसवणूक करु नका, अन्यथा एक दिवस…. ” ; विक्रम गोखलेंचा शिवसेना-भाजपाला सूचक इशारा!

बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील?

विक्रम गोखले म्हणाले, “ज्या कारणासाठी बाळासाहेबांनी आपला देह ठेवला. बाळासाहेबांनी ज्यासाठी आपली शिवसेना स्थापन केली. ज्या मराठी माणसाला एक आधार वाटला. त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील? याची कल्पना फक्त जे आता बाहेर राहून केवळ बघत आहेत, त्यांनाच येऊ शकते. त्यातला मी एक आहे. माझी सख्खी आत्येसासू ही बाळासाहेबांच्या महिला आघाडीची पहिली शिवसेना प्रमुख होती. बाळासाहेब माझे स्वतःचे मामे सासरे. तेव्हा बाळासाहेबांची भाषण ऐकूण महाराष्ट्र ४० वर्षे तृप्त झालेला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकारणातील जे खेळ सुरू आहेत. ते इतक्या विचित्र स्तरावर पोहचलेले आहेत, की त्यामध्ये मराठी माणूस असो किंवा आता महाराष्ट्रपुरते बोलायचे तर महाराष्ट्रातील माणूस हा भरडला जातोय. लोक अस्वस्थ आहेत, तुम्हाला कल्पना नाही. प्रसारमाध्यमांना फारशी कल्पना नसते. आमच्या सारखी माणसं फिरत असतात, सर्व क्षेत्रातील लोकांचा आमचा संपर्क येतो. त्या प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की हे सगळं गणित चुकलेलं आहे. परंतु हे गणित सुधारायचं असेल तर अजुनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावरती आता आपला देश उभा आहे, त्यातून त्याला मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र आलंचं पाहिजे, अशी माझी श्रद्धा आहे. माझे प्रयत्न सुरू आहेत. ”

“ फडणवीसांना मी प्रत्यक्ष प्रश्न विचारलेला होता की, तुमचं त्याने काय बिघडलं असतं? जर अडीच वर्षे त्यांना (शिवसेना) दिली असती. तुम्हाल कुठली हवी होती पहिली की नंतरची अडीच वर्षे? हे माझे त्यांना प्रश्न आहेत. मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. कारण, मी फाडफाड बोलणार माणूस आहे. मी वरचे आदेश वैगरे सगळं झुगारून देतो. त्यांच्या दोघांत जे काही झालं असेल ते त्यांनी जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे, लोकांना फसवून नका तुम्ही. लोक केव्हा तरी मग प्रचंड शिक्षा करतात आणि ती आता आपण भोगत आहोत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena first reaction to vikram gokhale statement kangana ranaut bjp shiv sena alliance srk