किनारपट्टीवरील मच्छिमार समाजाने शिवसेनेला भरभरून मते दिली, या समाजाने शिवसेनेच्या पालख्या वाहिल्या मात्र शिवसेनेने याच कोळी बांधवांना काहीच दिले नाही. शिवसेनेला मच्छीमार बांधवांचा विसर पडल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सातपाटी येथे केली.

तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या मच्छीमार समजाच्या मदतीच्या कार्यक्रमात ते आज(मंगळवार) बोलत होते. कोळी महासंघ व भाजपातर्फे सातपाटी येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मच्छिमार समाजाचे आमदार रमेश पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेकांना आर्थिक मदत, सातपाटी गावाकरिता रुग्णवाहिका, एडवण गावकरिता कुपनलिकांसाठी निधी वाटप करण्यात आला.

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आजही मच्छीमारांना मदत मिळत नाही, त्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत यासारखे दुर्दैव नसल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना या मच्छीमार समाजासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो व त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत असेही ते येथे म्हणाले.

अनिल देशमुख यांनी तपास यंत्रणेस सहकार्य करावं –

तर, तक्रारी किंवा आरोप झाल्यानंतर तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका ही सगळ्यांची असते, त्याप्रमाणे अनिल देशमुख यांनीही ती भूमिका घ्यावी अशा प्रकारची आपली भूमिका राहील असे पालघर दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सक्तवसुली संचलनालायच्या अनिल देशमुख यांच्या ऑनलाईन सुनावणीच्या मुद्द्यावर बोलले. कायद्याच्या चौकटीमध्ये जे अपेक्षित आहे, ते त्याठिकाणी होईलच. ऑनलाईन चौकशी ही संबंधित कार्यालयाला संयुक्तिक वाटली तर ते त्या प्रकारची भूमिका घेईल आणि तशी कारणमिमांसा त्यांना पटली नाही तर प्रत्यक्ष चौकशीला सामोरं जावं लागेल असेही दरेकर यांनी म्हटले.

वाढवण बंदराबाबत बोलताना दरेकर यांनी बंदर उभारणीला स्थानिकांचा विरोध असेल, तर स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन त्या भावना केंद्र सरकारकडे पोहचवू असे त्यांनी सांगितले.

Story img Loader