मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना राज्यातील राजकारणासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं, तर स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस, भाजपा जोरदार टोला लगावला होता. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत भाजपाने शिवसेनेवर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकावरुन भाजपाने टोला लगावला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. शिवसेनेनं विश्वासघात करून युती मोडली आणि विरोधकांसोबत गेली, असा आरोप उपाध्ये यांनी केला.

हेही वाचा- शिवसेना सत्तेसाठी लाचार होणार नाही!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

केशव उपाध्ये काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचं कौतुक… ममता लढल्या व जिंकल्या याला म्हणतात स्वबळ… बरोबर; त्यांचं कौतुक आहेच कारण त्यांनी समोरासमोर लढाई केली. सत्तेसाठी ज्यांच्यासोबत निवडणुका लढल्या त्यांचा विश्वासघात करीत, आयत्यावेळी युती मोडत विरोधकांसोबत नाही जाऊन बसल्या,” असं उपाध्ये यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते की,”संघराज्य व्यवस्थेवर दबाव वाढलेला असताना सगळ्यांसाठी पश्चिम बंगालचं उदाहरण आहे. एकट्यानं लढण्याचं उदाहरण बंगाल सर्वांसमोर ठेवलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्व प्रकारे हल्ले केले गेले. पण बंगाल माणसांनं त्याची ताकद दाखवून दिली. प्रादेशिक अस्मितेचं संरक्षण कसं करायला हवं हेही बंगालने दाखवून दिलं. ममता बॅनर्जी एकट्या लढल्या आणि जिंकल्याही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Story img Loader