शिवसेनेचे कोकणातील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या विरोधात पक्षांतर्गत चाललेले डावपेच पाहता आता कदमही मनोहर जोशी यांच्याप्रमाणेच एकाकी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
एकेकाळी युतीच्या सरकारातील मंत्री आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते अशा जबाबदाऱ्या सांभाळलेले कदम मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर क्वचितच कोकणात फिरकत आहेत. त्या उलट त्यांचे पक्षांतर्गत प्रमुख प्रतिस्पर्धी खासदार अनंत गीते व आमदार सूर्यकांत दळवी यांनी मात्र कोकणातील पक्ष संघटनेवर पकड मिळवण्यासाठी नेटाने प्रयत्न सुरू केले असून त्यांना बऱ्यापैकी यश येत आहे. त्यामुळेच उत्तर रत्नागिरी जिल्ह्य़ातील संघटनेतील पदांवरून कदम समर्थकांना हटवून सर्वत्र गीते-दळवी यांच्या विश्वासातील कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. गेल्या आठवडय़ात गुहागर तालुक्यात शृंगारतळी येथे आयोजित मेळाव्यात गीते यांनी कदम यांनाच नाव न घेता लक्ष्य केले. ते म्हणाले की, पक्षात बदल घडतच असतात आणि ते आवश्यक असतात. घडलेले बदल कार्यकर्त्यांनी स्वीकारायचे असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून प्रत्येक शिवसैनिकाने ती स्वीकारलीच पाहिजे. त्यावर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही.
याच मेळाव्यात गुहागर विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख सुरेश पालांडे यांनी, एखाद्-दुसरा दाढीवाला इकडे-तिकडे गेला म्हणून काहीही नुकसान होणार नाही. आज असे दाढीवाले आमच्याकडे अनेक आहेत, असा टोला कदम यांचे नाव न घेता हाणला.

गद्दारांनी निष्ठावंतांचे कातडे पांघरले आहे
गीते, पालांडे यांच्या वक्तव्यांबाबत शिवसेनेत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत असून कदम यांचे पद्धतशीर खच्चीकरण सुरू असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. खुद्द कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्यावर पक्षाने सध्या कोकणात कोणतीही जबाबदारी सोपवलेली नाही. त्यामुळे मी शांत आहे. शृंगारतळीच्या मेळाव्यात काय बोलले गेले ते मला कळले आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याची मी वाट पाहत आहे. सध्या गद्दारांनी निष्ठावंतांचे कातडे पांघरले आहे आणि निष्ठावंतांना घरी बसवण्यात आले आहे. गुहागरच्या निवडणुकीत मला ज्या प्रकारे पाडले ते लपून राहिलेले नाही. आता गवताला भाले फुटावेत तसे स्थानिक पक्षकार्यकर्ते त्याचा जाब विचारत आहेत. मी सध्या त्याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. आगामी निवडणुकांच्या काळात माझी भूमिका मांडेन. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जातीयवाद मानला नाही. पण गीते कुणबी-मराठा असे जातीचे राजकारण करत असल्याचा आरोप करून कदम म्हणाले की, ‘मातोश्री’वर या प्रकारांची दखल घेतली जाण्यास कदाचित विलंब लागेल, पण केव्हा तरी ती घेतली जाईल, असा माझा विश्वास आहे. मी त्याची वाट पाहत आहे. मात्र मी अखेपर्यंत शिवसेना सोडणार नाही.

Story img Loader