रायगड जिल्ह्य़ात राष्ट्रवादी आणि शेकापचे वर्चस्व असले तरी अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी आणि शेकापला कडवे आव्हान दिले आहे. राज्याच्या अन्य भागांमध्ये यश मिळविलेल्या भाजपला रायगडमध्ये मात्र मतदारांनी फारसा थारा दिलेला नाही. रायगड जिल्ह्य़ात झालेल्या नऊ नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक ४९ नगरसेवक निवडून आले. अलिबाग, पेणचा अपवाद वगळता सर्व नगरपालिकांमध्ये सेनेचे उमेदवार विजयी झाले. शहरी भागात फारशी सक्रिय नसणारी शिवसेना निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झाल्याचे दिसून आले. स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेसाठी उजवा ठरला. खासदार अनंत गीते यांचा अपवाद वगळता पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी स्थानिक नेत्यांनीच पार पाडली. तरीही मुरुड आणि माथेरान नगरपालिकांवर सत्ता स्थापन करण्यात शिवसेनेला यश आले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ नगरपालिका निवडणुकीतही मतदारांचा कल शिवसेनेच्या बाजून असल्याचे समोर आले. रोह्य़ात मात्र तटकरे कुटुंबातील वादाचा फायदा उचलण्याची सेनेची खेळी पुरती फसली. निवडणुकीच्या तोंडावर तटकरे यांच्या पुतण्याला शिवसेनेने पक्षात घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. पण तटकरेंचे पुतणे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला हे प्रमाण कायम राखता आले नाही. शिवसेनेचे मुरुड आणि माथेरान या दोनच ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. रायगड किल्ला असलेल्या महाडमध्ये मात्र काँग्रेसने बाजी मारली.
शिवसेनेचा जोर वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रसेची मात्र पीछेहाट झाली. मुरुड आणि माथेरानसारख्या नगरपालिका राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. तर खोपोली आणि रोहा नगरपालिका घेताना पक्षाला कसरत करावी लागली. निवडणुकीपुर्वी पक्षात झालेले बंडखोरी राष्ट्रवादीला महागात पडली. नगरसेवकांची संख्या ६३ वरून ३४ वर घसरली. मुरुडमध्ये तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून नगराध्यक्षासह सहा नगरसेवक सेनेत दाखल झाले. खोपोलीत राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांनी बंडखोरी करत भाजपत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोह्य़ात प्रस्थापितांना उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी उफाळून आली. विद्यमान नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून कडवी लढत दिली. सत्ता कायम राखण्यासाठी सुनील तटकरे यांना घरोघरी फिरावे लागले. तिरंगी लढतीचा फायदा राष्ट्रवादीला झाला आणि रोह्य़ात नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणारे संतोष पोटफोडे अवघ्या सहा मतांनी निवडून आले.
राष्ट्रवादीशी केलेली आघाडी शेतकरी कामगार पक्षासाठी घातक ठरली. अलिबागचा अपवाद वगळता पक्षाला फारसे यश मिळाले नाही. पेण, खोपोली, उरण यांसारख्या शहरात पक्षाचे पानिपत झाले. पक्षाची ताकद असूनही आघाडीमुळे उमेदवारी न देण्याचा निर्णय शेकापसाठी अडचणीचा ठरला. खोपोली आणि पेणमध्ये शेकापचे प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आले, तर उरणमध्ये पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. मुरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल असणाऱ्या नाराजीचा फटका शेकापला बसला.
उरणचा अपवाद वगळता भाजपला जिल्ह्य़ात मतदारांनी फार काही जनाधार दिला नाही. जिल्ह्य़ात भाजपचे केवळ १६ नगरसेवकच निवडून आले. उरणमध्ये बहुमत तर खोपोलीत तीन नगरसेवक वगळता अन्य सहा पालिकांमध्ये भाजपची पाटी कोरी राहिली. मडाड आणि पेणचे नगराध्यक्षपदे जिंकून काँग्रेसने ताकद कायम राखली. पेणमध्ये शेकापचा आमदार असताना काँग्रेसला मिळालेल्या यशाने शेकापला तो धक्का मानला जातो.