अमरावती जिल्ह्यातही शिवसेनेला अखेर खिंडार पडले असून, ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे दर्यापूर तालुका प्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
शिवसनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा संदेश दिल्यानंतर त्यांचे समर्थक संभ्रमित अवस्थेत होते. पण, आता अभिजित अडसूळ हे उघडपणे समोर आले आहेत. ठाणे येथील माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या उपस्थितीत अमरावतीत एक बैठक पार पडली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, दर्यापूर येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकाऱ्यांनी दर्यापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या गटात प्रवेश केला.
शिवसेनेला आम्ही सोडून गेलेलो नाही –
“शिवसेनेला आम्ही सोडून गेलेलो नाही. आम्हाला मानणारे दर्यापूर तालुक्यातीलच नव्हे, तर अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि राज्यातील इतर भागातील शिवसैनिक शिंदे यांच्यासोबत आहेत.”, असे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी सांगितले.