विचारांचं सोनं लुटण्याकरता दरवर्षी प्रथेप्रमाणे शिवसैनिक दादरच्या शिवाजी पार्क येथे गर्दी करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचा वारसा उद्धव ठाकरे चालवत आहेत. मात्र, गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत फूट पडल्याने दसरा मेळाव्याचं आयोजनही विभागलं गेलं. दोन्ही गटांकडून दसरा मेळावा आयोजित केला जातो. तसंच, परंपरेनुसार हा मेळावा शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क येथे होण्याकरता दोन्ही गटात चुरस रंगते. मात्र, यंदा प्रकरण अधिक तापण्याआधीच शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे दादरच्या शिवाजी पार्क येथे ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >> शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबईच्या शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेता यावा याकरता ठाकरे आणि शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेत ऑगस्ट महिन्यात अर्ज करण्यात आले होते. परंतु, या अर्जप्रक्रियेत शिंदे गटाने फेरफार केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काल (९ ऑक्टोबर) केला होता. तसंच, मुंबई पालिकेने परवानगी दिली नाही तर याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचाही इशारा दिला होता. दरम्यान, आज (१० ऑक्टोबर) शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्याचा ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“दसरा मेळावा होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले. बेईमान लोकांना हाताशी पकडून अनेक प्रयत्न झाले. शेवटी शिवसेना ही आग आहे, ताकद आहे. तुम्ही कितीही अडथळे आणा. सर्व अडथळे पार करून आम्ही तिथे मेळावे घेतले आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्रातील एक उत्सव असतो. तो संस्कृतीचा भाग आहे, आणि तो कोणी रोखू शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.