शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी (२० जानवारी) होणार आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिवसेना नेमकी कुणाची? याबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होती. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून या सुनावणीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र यावर आज निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान एकीकडे ही महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रसारमाध्यमाना विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या. यामध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर निशाणा साधला.
अंबादास दानवे म्हणाले, “हा जो युक्तीवाद शिवसेनेकडून होतोय, मला वाटतं हा जनतेच्या मनातला युक्तीवाद मानला जातोय. कारण, शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. याच शिवसेनेच्या मागे जनता आहे. याच शिवसेनेच्या आमच्या सारख्या शिवसैनिकांनी लाखो लोकांना शिवसेनेचं सदस्यत्व दिलं आहे. गाव पातळीवर शिवसेना स्थापन केलेली आहे. त्यातून मग तालुका, जिल्हा असे सगळे युनिट तयार झाले आणि ती मिळून शिवसेना निर्माण झालेली आहे. फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना निर्माण होत नाही.”
हेही वाचा – “… तो पक्षद्रोह नव्हता? मुळात त्यांचं सदस्यत्वच रद्द होतंय” अरविंद सावंतांचं शिंदे गटाला उद्देशून विधान!
याचबरोबर, “मी हे उदाहरण देईन की मागील वेळी मनसेचा एकच आमदार होता. हा एक आमदार फुटला होता. म्हणून काय मनसेचं चिन्हं गेलं का? की मनसे पक्ष गेला? म्हणून लोकप्रतिनिधी, कोणतेही खासदार आमदार असणं हा एक संघटनेचा भाग आहे. परंतु पूर्ण संघटना नाही.” असंही दानवेंनी म्हटलं.
याशिवाय, “मला असं वाटतं हा जर युक्तीवाद बघितला तर शिवसेना गावपातळीवरच नाही तर पाड्यांवर, तांड्यावर पोहचलेली आहे. आमच्यासारखे शिवसैनिक लोकांच्या घऱोघरी जाऊन त्यांना शिवसेनेत सहभागी करून घेतात. कोणतीही खासगी एजन्सी पैसे देऊन लावण्याची आम्हाला गरज पडत नाही. खऱ्या अर्थाने नैसर्गिकरित्या जी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील शिवसेना आहे, ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच काम करते.” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.