|| दयानंद लिपारे
राममंदिराच्या मुद्दय़ावर स्वार होऊन सत्ताशकट हाकण्याचा जोमाने प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेने आपल्या घोषवाक्यांमध्ये आता ‘जय महाराष्ट्र’ला ‘जय श्रीराम’ची जोड दिली आहे. शिवसैनिकांनी अभिवादन करताना ‘जय महाराष्ट्र’ या शब्दप्रयोगाबरोबरच ‘जय श्रीराम’ असेही म्हणावे, अशी सूचनाच पक्षाने दिली आहे.
शिवसेनेने राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी महाआरती केली, तेव्हा या बदलाचा प्रत्यय सामान्य नागरिकांनाही आला. शिवसेनेची देशभर व्याप्ती वाढवण्यासाठी ‘जय महाराष्ट्र’ हा अभिवादनाचा शब्द अपुरा ठरणार असल्याने रामानामाचा आधार घेतला असल्याचे स्पष्ट होत असून वारे पाहून अभिवादनाची दिशाही शिवसेनेने बदलली असल्याचे यातून अधोरेखित होत आहे. खरे पाहता पूर्वी महाराष्ट्रात ‘रामराम’ हा शब्द अभिवादनाचा वा निरोपाचा म्हणून प्रत्येकाच्या तोंडी होता. काळ बदलत गेला तशी त्याची जागा ‘नमस्कार’ने घेतली. राजकीय पक्षांनी आणि विचारसरणींनी आपला पाया भक्कम करण्यासाठीही काही शब्दप्रयोग सुरू केले आणि ते आता रुळलेही आहेत. ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भीम’ हे राज्यात सर्वाधिक प्रचलित शब्दप्रयोग आहेत.
आता शिवसेनेने आपल्या अभिवादनात ‘जय महाराष्ट्र’च्या जोडीनेच ‘जय श्रीराम’ असा शब्दप्रयोग सुरू केला आहे. अभिवादानासाठी एकच शब्द वापरण्याची पद्धत असताना शिवसेनेने एकाच वेळी दोन शब्द वापरून एक नवा पायंडा पाडल्याचे दिसत आहे.
प्रभाव वाढविण्यासाठीच.. लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी याबाबत सांगितले, की समोरच्या व्यक्तीप्रती कृती आणि शब्दातून नम्रता प्रकट करण्याची अभिवादनाची पद्धत सर्वत्र रूढ आहे. शिवसेनेने आपला प्रभाव वाढावा यासाठी हा बदल केल्याचे दिसते. आपल्या भागासाठी हक्काचा एक आणि अन्य भागांसाठी आणखी व्यापक अशी शब्दयोजना त्यांनी केल्याचे दिसते.
तशा सूचनाच..
शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी या नव्या अभिवादनाबाबत सूचना शिवसैनिकांना आल्या असल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले. तर, शिवसैनिकांनी अशा अभिवादनाला सुरुवात केल्याचे शिवसेनेचे इचलकरंजी शहर उपप्रमुख राजू आरगे यांनी नमूद केले.