राहुल गांधींनी पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका करणे म्हणजे स्वत:चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून यातला प्रकार आहे. काँग्रेसने भाजपाला विचारून त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा हा हट्ट कशासाठी?, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. भाजपाने ‘यूपीए’तील मित्रपक्षांची चिंता सोडावी व आपल्या मित्रपक्षांच्या पाठीत जे खंजीर खुपसले गेले आहेत ते आधी पाहावे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करुन आघाडीतील इतर पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका भाजपाने केली आहे. या टीकेचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून गुरुवारी समाचार घेण्यात आला. राहुल गांधींचे विधान लोकशाहीस धरुन नाही, यातून अरेरावी व अंहकार दिसतो, असे भाजपाचे म्हणणे आहे. मोदींनीही यावरुन राहुल गांधींवर टीका केली. पण हा प्रकार म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान थाटाचा आहे, असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.
काँग्रेसचा आघाडीतील मित्रपक्षांशी विसंवाद असल्याचे भाजपाला वाटते. मग राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जुन्या मित्रपक्षांशी भाजपाचा किती संवाद आहे, त्यांनी कोणते निर्णय एकोप्याने घेतले. उलट भाजपाने मित्रपक्षांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्या मदतीने सत्तेवर आले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भाजपाने केले, असा आरोप शिवसेनेने केला.
राहुल गांधी २०१४ साली जसे होते, तसे आता राहिलेले नाही. विखारी टीका सहन करुन ते आता मानसिकदृष्ट्या खंबीर झाल्याचे दिसते. २०१९ मध्ये ते भाजपासमोर आव्हान उभे करु शकतील इतकी त्यांची ताकद असून गुजरातमध्ये त्यांनी हे सिद्ध केले, असे अग्रलेखात म्हटले आहे.
भाजपाने राहुल गांधींवर खालच्या पातळीवर टीका केली. पण राहुल गांधींनी मोदींवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. यातून राहुल गांधींचे संस्कार दिसतात, असे शिवसेनेने नमूद केले. राहुल गांधी परस्पर उमेदवारी कशी जाहीर करतात, असा भाजपाचा सवाल आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांना लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी ही ज्येष्ठ नेतेमंडळी देऊ शकतील. अडवाणी राष्ट्रपतीपदावर विराजमान होतील असे वाटत होते. पण मोदी- शहांच्या जे मनात होते तेच झाले. पक्षातील ज्येष्ठांना व मित्रपक्षांना विचारात न घेता निर्णय झालेच ना?, मग काँग्रेसने भाजपाला विचारुन उमेदवार घोषित करावा हा हट्ट कशासाठी. राहुल गांधी पंतप्रधान होतील की खड्ड्यात जातील हे जनता ठरवेल, असेही शिवसेनेने स्पष्ट केले. निवडणुकीपूर्वी मोदी बरे वाटायचे. पण देशाचे खरे झाले काय, असा प्रश्न विचारत शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला.