केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल (शनिवार) चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
तर, आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ट्वीटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत, शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे? –
“आमचे चिन्ह गोठले असेल, रक्त नाही.” असं एक ट्वीट करत दानवेंनी सोबत उद्धव ठाकरे यांचा जाहीर सभेतील दोन्ही हात उंचावतानाचा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा : ‘आमचं चिन्ह…’, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…!
याचबरोबर, “आता कदाचित न पक्षाचे नाव असेल न चिन्ह! सोबत आहे फक्त ‘ठाकरे’ नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म.. कायदेशीर लढाया सुरूच राहतील.. मात्र आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील.” असं म्हणत दानवेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
शिंदे गटाला मोठा दिलासा –
तर दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेना नाव वापरण्यास घालण्यात आलेली तात्पुरती बंदी किंवा धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या वादातील अर्धी लढाई जिंकल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, दोन्ही गटांनी पर्यायी नावांबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. तर शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
आज दोन्ही गटाच्या बैठका –
शिवसेनेच्या काही नेत्यांनी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्र )अशी काही पर्यायी नावे आणि काही निवडणूक चिन्हांचा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी विचार केला जाईल, असे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदार-आमदारांची रविवारी सायंकाळी बैठक आयोजित केली आहे.