लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली. मात्र, तरीही महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावापाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. महायुतीमध्ये काही जागांवरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. यामध्ये नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह काही जागांचा तिढा आहे. या जागावाटपावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपाला एक मोलाचा सल्ला देत सूचक इशारा दिला आहे. ‘भाजपाने शिवसेनेबरोबरची मैत्री जपावी, अन्यथा शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण होईल’, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.
अर्जून खोतकर नेमके काय म्हणाले?
“शिवसेनेचे सर्व खासदार विश्वास ठेवून आपल्याबरोबर आले आहेत. त्यामुळे तेवढी तरी मैत्री जपली पाहिजे. मला असे वाटते की, तुम्ही (भाजपाने) त्या जागा सोडून वाद घातला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ, नाशिक या जागा शिवसेनेच्या आहेत. तरीही तुम्ही या जागा मागत असाल तर सहाजिकच शिवसैनिकांच्या मनामध्ये चीड निर्माण होईल. आपल्या हक्काच्या जागा अशा पद्धतीने दबावतंत्राने मागत असतील तर हे फार वाईट असून याचा संदेश चांगला जात नाही”, असे अर्जून खोतकर म्हणाले.
हेही वाचा : अमरावतीतील निवडणुकीबाबत बच्चू कडूंचं सूचक भाष्य; म्हणाले, “अभिजीत अडसूळ आणि आमचं…”
खोतकर यांनी पक्षाकडे काय मागणी केली होती?
अर्जून खोतकर म्हणाले, “मी देखील पक्षाकडे बोललो होतो की, “भारतीय जनता पक्षाने २० जागा जाहीर केल्या तर आपणही आपल्या १२ किंवा १३ खासदारांच्या जागा जाहीर केल्या पाहिजे होत्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जे ठरवून दिले ते केले. पण शिवसेनेच्या ज्या जागा होत्या, त्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करायला हव्या होत्या. आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना चारवेळा शक्तीप्रदर्थन करावे लागते आहे. त्यामुळे लोकांमध्ये दुही निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर यातूनच पुढे काहीतरी वेगळे घडते”, असे अर्जून खोतकर म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने आपली पहिली यादी जाहीर केली. यामध्ये एकूण नऊ मतदारसंघातील उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आले. यामध्ये मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलीक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, हिंगोलीमधून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगले येथून धैर्यशिल माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.