अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय, राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. शिंदे गट-भाजपाकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला ही निवडणूक न लढण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल पत्रकारपरिषदेत बोलताना ही निवडणूक बिनविरोध करावी असं म्हटलं. तर राज ठाकरेंच्या या भूमिकेवर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

‘भाजपा माणुसकीहीन, संवेदनाहीन, संस्कृतीहीन पक्ष आहे…! इतका छळवाद झाला तेंव्हा राज ठाकरे गप्प होते. आता फॉर्म भरुन झाला आहे, भूमिका व्यक्त करण्यास उशीर परंतु एक संवेदनशीलता दाखवली त्याबद्दल आभार…! ’ असं अरविंद सावंतांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘राजसाहेब एक म्हण आठवली “कपटी भावा पेक्षा…”’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रानंतर संदीप देशपांडेंच ट्वीट

ट्वीटसोबत शेअर केलेल्या व्हिडिओत अरविंद सावंत म्हणाले, “ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण उशीर झाला आहे. देर आए दुरुस्त आए असं म्हणता येईल, ते त्यांच्या व्यक्तीपुरतं म्हणता येईल. पण प्रत्यक्षात काय घडलं? निवडणूक आयोगाकडे जेव्हा शिवसेना नाव आणि चिन्हाच्या संदर्भात वाद घातला. तेव्हा या शिंदे गटाने काय म्हटलं की धनुष्यबाणाचा गैरवापर होईल आणि म्हणून ते गोठवावं. ते चिन्ह गोठवावं, आम्हाला द्यावं किंवा नाव गोठवावं पण ते निवडणूक लढत आहेत का? खोटेपणा तिथे केला, किती खोटारडी माणसं आहेत. त्यांच्या प्रत्येक नेत्यांचं विधान हे कायम खोटं असणार आणि होतं. त्यांचं हे सरळसरळ समोर दिसलेलं, अनुभवलेलं उदाहरण आहे. ”

तर “एवढं करून ते थांबले का? ते थांबले नाही. तर ऋुतुजा लटके यांचा राजीनामा मंजुर करताना जे गलिच्छ राजकारण खेळलं गेलं, जो दबाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टाकला. त्यांनी कितीही जरी सांगितलं, की आमचा दबाव नव्हता. तर मी उलट प्रश्न विचारतो की मग राजीनामा मंजुर करण्याचे आदेश का नाही दिले? तुमचा दबाव होताच होता. दुर्दैवाने अधिकारी गुलामासारखे वागले. त्यांनी मुंबई महापालिकेला कलंक लावला, लांच्छन लावलं. इतका छळवाद जेव्हा झाला तेव्हा राज ठाकरे गप्प होते आणि आता त्यांनी हे जेव्हा हे सांगितलं तेव्हा अर्ज वैगरे भरून झालेला आहे. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. कदाचित लक्षात आलं असेल की पराभव होईल, म्हणून त्यांनीच यांना नाही ना सांगितलं, की तुम्ही असं एक पत्र द्या आम्हाला. आम्हाला थेट माघार घेता येणार नाही. मग राज ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन आम्ही माघार घेतली असं दाखवायचं असेल. ही पळवाट आहे, पण दुर्दैव आहे.” असंही सावंत म्हणाले आहेत.

याचबरोबर “राज ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या या राजकारणात स्वत:ला गुंतवून घेऊ नये असं मला वाटतं. कारण, यांनी(भाजपा) माणुसकी सोडलेली आहे. ही संवेदनाहीन माणसं आहेत. कोल्हापूर पोटनिवडणुकीत काय घडलं हे तुम्ही बघा. जयश्री जाधव जेव्हा उभा राहिल्या, ती जागा शिवसेनेची होती. शिवसेनेने दिलदारपणे सांगितलं की आमचा पराभव झाला होता, पण आम्ही हट्ट नाही केला. तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले होते भाजपाचा पराभव झाला तर मी हिमालयात जाईन. तेव्हा सुद्धा त्यांनी माणुसकी दाखवली नाही. हे लोक काय माणुसकी दाखवणार. आता कळू द्या ना हिंदू. खरंतर त्यांनी हिंदूत्व हा शब्द देखील त्यांनी वापरू नये. माणुसकीहीन, संवेदनाहीन, संस्कृतीहीन असा तो(भाजपा) पक्ष आहे. म्हणून कृतज्ञता हा शब्द त्यांच्यासाठी नाहीच. त्यामुळे त्यांनी जी काय भूमिका घेतली असेल, तर फार उशीर झालेला आहे. पण एक संवेदना दाखवली त्याबद्दल आभार आहे.” अशा शब्दांमध्ये अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.