लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महायुतीच्या नेत्यांनी ४५ प्लसचा नारा दिला होता. मात्र, त्यामध्ये महायुतीला पाहिजे तेवढं यश मिळवता आलं नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांनी यावर भाष्य करत सूचक विधान केलं आहे.

वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी या तीन टर्मपासून निवडून आल्या. मात्र, यावेळी भावना गवळी यांना पक्षाने तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांना धक्का बसला. तर वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, राजश्री पाटील यांचा पराभव झाला. यावर आता भावना गवळी यांनी भाष्य करत सूचक विधान केलं. “एकनाथ शिंदे आणि पक्षावर दबाव होता, तिकीट देऊ नका, त्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली. मात्र, अशा प्रकारच्या स्क्रिप्ट पक्षाच्या हिताच्या नसतात”, असं भाष्य भावना गवळी यांनी केलं. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कुणाकडे होता? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा : कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव का झाला? हसन मुश्रीफांनी सांगितलं कारण, म्हणाले, “माझ्यासाठी हा धक्का”

भावना गवळी काय म्हणाल्या?

“वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत जनतेनं काहीतरी मनात ठरवलं होतं. असंच काहीसं दिसत आहे. संपूर्ण वाशिम आणि यवतमाळची जनता अनेक वर्षांपासून खासदार म्हणून पाहत आहे. मी काम केलं आणि शिवसेना पक्षाची सक्षमपणे धुरा संभाळत आले. पण यावेळी जे चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं, त्याचाच हा एक भाग आहे. जनतेची जी इच्छा होती, ती इच्छा कदाचित पक्षाच्या वरिष्ठांकडून पूर्ण झाली नाही. जनतेने हे मतांच्या रूपाने दखवलं आहे”, असं भावना गवळी यांनी म्हटलं.

“कधी कधी सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजे. मला असं वाटतं की, ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मी होते. त्यांनी मागिल अनेक वर्षांपासून माझ्यावर विश्वास दाखवला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव होता, असं म्हणायला आता काही हरकत नाही”, असं मोठं विधान भावना गवळी यांनी केलं आहे.

त्या पुढं म्हणाल्या, “हेमंत पाटील यांनीही मान्य केलं होतं की, ही स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे. त्यामुळे मलाही असे वाटते की जेव्हा अशा स्क्रिप्ट लिहिल्या जातात, तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मला तिकीट देण्याची तळमळ होती. मात्र, त्यामध्ये अनेक अडचणी आल्या. आता मी एवढंच सांगते, मी शिवसेनेचे काम करत असून असंच काम पुढेही सुरू ठेवणार आहे. विदर्भात शिवसेनेचं काम आम्ही चांगलं केलेलं आहे. पण राजकीय गणित बदलल्यामुळे काही वेगळे चित्र निर्माण झाले. त्यामुळे हार जीत होत असते”, असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे.