Gulabrao Patil : महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. विधानसभेत मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीकडून राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. मात्र, निकाल लागून आठ दिवस झाले तरीही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. यातच महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत सस्पेंस कायम असल्याचं बोललं जात आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडल्याची भूमिका आधीच पत्रकार परिषदेत जाहीर केलेली आहे. पण एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. मात्र, गृहखातं देण्यास भाजपाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे.
यातच ते दोन दिवस साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी गेले होते. दरम्यान, या सर्व घडामोडीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. यावर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली होती. याच टीकेला उत्तर देत शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ‘ठाकरे गटाचे १० आमदार आमच्याकडे (शिवसेना शिंदे) येण्याच्या तयारीत आहेत”, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा : “अजित पवार महायुतीत नसते तर शिवसेना १०० जागा जिंकली असती”, गुलाबराव पाटील असं का म्हणाले?
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
“त्यांच्या (उद्धव ठाकरे) महालामध्ये आमच्या सारख्यांची देखील एक वीट आहे. मात्र, त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत यांच्यासारखा एक दगड घेऊन आले आणि त्या दगडाने त्यांच्या महालाचा पूर्ण सत्यानाश करून टाकला. ते जळगाव जिल्ह्यात येऊन आमच्या पाच जागा पाडणार होते. दोन-दोन दिवस जिल्ह्यात येऊन बसले, पण साधा एक उमेदवार ते वाचू शकले नाहीत. त्यामुळे संजय राऊतांना आतातरी हे ओळखावं आणि उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊतांना ओळखावं. अन्यथा जे २० आमदार आहेत ना? त्यातील १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत. आगे-आगे देखिए होता है क्या”, असं गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
…तर आमच्या १०० जागा निवडणूक आल्या असत्या : गुलाबराव पाटील
शिवेसेना (शिंदे) नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, “महायुतीमध्ये आमचा पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत एकूण ८५ जागा लढला. त्यामध्ये आमचे ५७ उमेदवार निवडून आले. महायुतीत अजित पवार आमच्यामध्ये नसते तर आज शिवसेनेच्या ९० ते १०० जागा निवडून आल्या असत्या. मात्र, महायुतीने अजित पवारांना सामावून घेतल्यावर आम्ही विरोध केला नाही. अजित पवार महायुतीत आले म्हणून आमच्या नेत्यांनी (एकनाथ शिंदे) वरिष्ठांना तुम्ही अजित पवारांना का घेतलंत? असा प्रश्न विचारला नाही”, असंही शिंदे यांनी म्हटलं.
गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन करायचं सोडून एकनाथ शिंदे शेतीच्या नावाखाली गावी निघून गेले आहेत. हे अशोभनीय आहे. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं. महालात राहणाऱ्यांना शेत काय कळणार? मातीशी जोडलेला माणूसच नेता होऊ शकतो. आम्ही सत्तास्थापन करूच. तुम्ही तुमच्या २० आमदारांकडे बघा. त्यातले १० जण इकडे येण्याचा विचार करत आहेत”.