गेले सुमारे ४३ दिवस पोलिसांचा ससेमिरा चुकवत राहिलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक अखेर आज पोलिसांना शरण आले. पण तुरुंगाची हवा टाळण्यासाठी अस्वस्थपणाचे कारण देत ते येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान महाडिक यांच्यासह तिघांना न्यायालयाने येत्या ११ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार नीलेश भुरवणे यांच्यासह तिघांचे गेल्या २६ ऑक्टोबर रोजी अपहरण केल्याचा गुन्हा महाडिक, सेनेचे नगरसेवक बंडय़ा बोरूकर आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे छोटय़ा गवाणकर यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला होता. पण हे तिघेही जण त्याच दिवसापासून फरारी होऊन अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होते. त्याबाबतचा त्यांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. मात्र तेथेही डाळ न शिजल्यामुळे त्यांना पोलिसांना शरण जाण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिला नाही. त्यानुसार आज तिघांनाही पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या ११ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे कोणत्याही मोर्चा-आंदोलनामध्ये अग्रभागी राहणाऱ्या महाडिक यांनी तुरुंगाच्या हवेपेक्षा अस्वस्थपणाचे कारण देत जिल्हा रुग्णालयात राहणे पसंत केले.
तुरुंगाची हवा टाळण्यासाठी सेना जिल्हाप्रमुख महाडिक रुग्णालयात
तुरुंगाची हवा टाळण्यासाठी अस्वस्थपणाचे कारण देत ते येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत
Written by झियाऊद्दीन सय्यद
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-12-2015 at 00:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader hospitalised to avoid prison