Ramdas Kadam On Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (१५ फेब्रुवारी) रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शिवसेनेचे (शिंदे) नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कधीही फुटली नसती’, असा दावाही रामदास कदम यांनी सभेत बोलताना केला. तसेच ‘आम्ही जर तोंड उघडलं ना तर उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावं लागेल’, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामदास कदम काय म्हणाले?

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. शिवसेना प्रमुखांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. मला सांगा शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? पण त्यांनी नारायण राणे, मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं. माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसालाही त्यांनी नेता केलं. मात्र, जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं होतं ते सर्व उद्धव ठाकरे यांनी गमावलं. उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना देखील फुटली नसती. मी हे जबाबदारीने बोलत आहे”, असं रामदास कदम यांनी म्हटलं.

“शिवसेना मोठी कोणी केली असेल तर माझ्या कोकणी माणसांनी मोठी केली. जेव्हा एकनाथ शिंदेंनी उठाव केला होता, तेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की ४० पैकी एकाही आमदाराला मी निवडून येऊ देणार नाही. तेव्हा खोके-खोके म्हणून वडील आणि मुलगा थकले. मात्र, ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू, मी आणि एकनाथ शिंदे आम्ही तोंड उघडू त्या दिवशी उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावं लागेल. एकनाथ शिंदे म्हणाले होते की ४० पैकी ४० आमदार पुन्हा निवडून आणेन आणि त्यांनी ते निवडून देखील आणले”, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“नारायण राणे यांना सर्वात जास्त माहिती आहे की कुणाचे खोके कुठे आहेत? या महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना खोक्यात बंद करुन टाकलं. आता तरी खोके म्हणायचं बंद करा. पण रस्सी जळाली तरी रस्सीचा पीळ जात नाही. कोकणात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे आणि रामदास कदम यांनी त्या काळात खूप काम केलं. मी देखील नेहमी सांगायचो की जर पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, त्यांना वाढवा. मात्र, याबाबतचा अनुभव रामदास कदम यांनी घेतला. नारायण राणे यांनी देखील याचा अनुभव घेतला. शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपल्या पक्षात कोणीही मालक नाही. राजाचा मुलगा राजा नाही तर जो काम करेल तो राजा बनेल असा आपला पक्ष आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

‘ज्या पक्षाला विचारांची वाळवी लागली त्या पक्षात…’

“आधी ते (ठाकरे) म्हणायचे की कोण एकनाथ शिंदे? कोण रामदास कदम? पण आम्ही कोण आहोत हे त्यांना दाखवून दिलं. आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे आणि न्याय देणारे लोक आहोत. अडीच वर्षांपूर्वी या देशानेच नाही तर जगाने नोंद घेतली. आता राजन साळवी आपल्याकडे आले आहेत. पण त्यांनी खरं तर अडीच वर्षांपूर्वीच आपल्याकडे यायला पाहिजे होतं. पण आता ते आपल्याकडे आलेत. कोकणात एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेत का येत आहेत? ज्या पक्षाला विचारांची वाळवी लागली त्या पक्षात राजन साळवी तरी कसे राहतील? मग तेही आले शिवसेनेत”, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader ramdas kadam criticism to uddhav thackeray politics ratnagiri speech gkt