स्थलांतरित मजूर, कामगारांना परराज्यांमधील मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वेगाडय़ा कमी उपलब्ध होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करताच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारपासून हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या देतो, असे ट्विटरवरून जाहीर करून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात तटविला. तसंच त्यांनी राज्याकडे प्रवाशांची यादी देण्याचीही मागणी केली होती. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना टोला लगावत तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करता हे विसरू नका असं म्हटलं आहे.

“१४ मे रोजी नागपुरवरून उधमपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या ट्रेनसाठी कोणती यादी घेतली होती. आधी ट्रेन आणि नंतर माणसं जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले हे कृपया जाहीर करा. मग आता यादी कसली मागताय. तुम्ही राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करता हे विसरू नका,” असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी ट्विटरवून त्यांना ही आठवण करून दिली.

आणखी वाचा- “ज्या ठिकाणी पोहोचायची तिकडेच ट्रेन पोहोचू द्या,” यादी मागणाऱ्या रेल्वेमंत्र्यांना राऊतांचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे केलेल्या भाषणात रेल्वेमंत्रालयाकडून अतिशय कमी विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध होत असल्याचा तक्रारीचा सूर लावला होता. लाखो मजुरांना मूळ गावी जायचं आहे, राज्य सरकारच्या यंत्रणेकडे त्यांच्या याद्या तयार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी १२५ विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देत असून मजुरांची यादी, वैद्यकीय प्रमाणपत्रं, रेल्वेगाडी कुठून व कोणत्या स्थानकापर्यंत हवी आहे, आदी तपशील एक तासात रेल्वे महाव्यवस्थापकांकडे पाठवावा, अशी विनंती केली. त्याचबरोबर सोमवारपासून गरजेनुसार रेल्वेगाड्या मिळतील, अशी हमी दिली होती.

Story img Loader