शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील तेवढ्याच ताकदीने शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका-टिप्पणी करताना दिसतात. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे त्या महाराष्ट्रात कमी कालावधित शिवसेनेच्या रोखठोक भाषण आणि विधानं करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. त्यांच्या खोचक आणि टेलेबाजीयुक्त भाषणांमुळे त्या कमी कालावधित चर्चेत आल्या आहेत. असे असतानाच त्यांनी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो, असे विधान त्यांनी केले आहे. त्या चंद्रपूरमध्ये एका सभेला संबोधित करत होत्या.
हेही वाचा >>>> चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये रुग्णशय्या उपलब्ध नाहीत
“माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील. आगामी काळात माझ्यावर काही संकटं येऊ शकतात. मात्र मला त्याची पर्वा नाही. मला वाटतं की माणसं जागी झाली पाहिजेत. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो. आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. माझी प्रतिकात्मक तिरडी बांधू देत किंवा प्रत्यक्ष तिरडी बांधू देत, मी मात्र माझं काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे,” असे विधान सुषमा अंधारे यांनी केले आहे.
दरम्यान, सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. त्यांच्या विधानांमुळे वारकरी संप्रदाय नाराज झाल्याचं बोललं जात होतं. या नाराजीनंतर त्यांनी जाहीर माफीही मागितली होती. सुषमा अंधारेंनी केलेल्या काही विधानांमुळे वारकरी संप्रदाय आक्रमक झाला होता. या वक्तव्यांचा निषेध म्हणून आळंदीत प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली होती. “भागवत संप्रदायातील संतपरंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही,” असे त्या म्हणाल्या होत्या.