Uday Samant on Vijay Wadettiwar: “एकनाथ शिंदे यांची गरज संपली का? कदाचित ते बाजूला व्हावेत, असा प्रयत्न होतोय का? किंवा यापुढे जाऊन मी म्हणेण की, उद्धव ठाकरेंना संपविण्यासाठी एकनाथ शिंदेंना पुढे आणले आणि आता शिंदेंना संपविण्यासाठी नवा ‘उदय’ पुढे येईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येऊ शकते”, असे विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी दावोस येथे गेले आहेत. मात्र राज्यात राजकीय भूकंप करणारी विधाने झाल्यानंतर त्यांनी लागलीच व्हिडीओ प्रसारित करत स्पष्टीकरण दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदय सामंत यांचा पलटवार

उदय सामंत यांनी पहिल्यांदा संजय राऊत यांचा निषेध केला. ते म्हणाले, “शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेले विधान ऐकले. त्यांचे विधान राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यात मी सामील होतो. त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्रीपद मिळाले. याची मला पूर्ण जाणीव आहे. मला राजकीय जीवनात घडविण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही. एकनाथ शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे कुणीही आमच्यात वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही.”

भाजपात येण्यासाठी विजय वडेट्टीवारांचे प्रयत्न

विजय वडेट्टीवारांच्या विधानाचा उल्लेख करत उदय सामंत यांनी त्यांच्यावरही पलटवार केला. मी कधीही कुणावर वैयक्तिक टीका करत नाही. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संपविण्यासाठी असे फालतू षडयंत्र कुणी करू नये, ही माझी सूचना आहे, असे सांगत उदय सामंत यांनी टीका केली. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे, मी आणि तुम्हीही (वडेट्टीवार) सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाला आहात. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातून आलेली दोन लोक एकत्र असतील तर त्यांना वेगळे करण्याचे षडयंत्र तुम्ही करू नका. कारण तुम्हीदेखील भाजपामध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कितीवेळा भेटलात, याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader uday samant statement on vijay wadettiwar who indicates about political crisis kvg