“अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं प्रकरण वरकरणी दिसतं, तेवढं सोप नाही. ज्या गुडांने सूडभावनेतून हत्या केली, असे आपण समजू. पण त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या का केली? हा प्रश्न निर्माण होतो. ज्याप्रमाणे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ कुणीही न मागता समोर आला. तसे मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले होते. पण त्यामध्ये नेमक्या गोळ्या कुणी झाडल्या हे दिसत नाही”, अशी शंका उपस्थित करून शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला’, फडणवीसांनी श्वानाचा उल्लेख केल्यावरून उद्धव ठाकरेंची टीका

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी काल काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. तेव्हा त्यांनी माहिती दिली की, मॉरिसकडे परवानाधारक बंदूक नव्हती. त्याने खासगी सुरक्षा रक्षक ठेवला होता. त्याला सुरक्षारक्षक ठेवण्याची वेळ का आली? या सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून या गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले जाते. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या मॉरिसनेच झाडल्या की आणखी कुणी झाडल्या? या दोघांनाही मारण्याची सुपारी कुणी दिली होती का? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यापालांनी मॉरिसचा सत्कार केला

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले. अभिषेक घोसाळकर प्रकरणात आम्ही राज्यपालांकडे जाणार नाहीत. कारण याआधीचे राज्यपाल जरा जास्तच कर्तव्यदक्ष होते. माजी राज्यपाल कोश्यारी यांचा मॉरिस या गुंडाबरोबर एकत्र फोटो आहे. राज्यपालांच्या हस्ते अशा गुंडांचे सत्कार होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

“गाडीखाली एखाद्या श्वानाचा मृत्यू झाला तर…”, राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे विधान

अभिषेक घोसाळकर यांची तुलना श्वानाशी कशी करता?

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर बोलताना श्वान गाडीखाली येऊन मेलं, तरी माझ्यावर आरोप करतील, अशी टीका केली होती. या टीकेचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंनी त्यांना टोला लगावला. “श्वान गाडीखाली मेलं तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले. त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. तुम्ही अतिशय निर्ढावलेले, निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात. फडणवीस यांच्यासाठी मी याआधी फडतूस, कलंक असे शब्द वापरले होते. पण आता हे शब्दही तोकडे पडत आहेत. महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे सर्वच प्राण्यांची आणि माणसांची जबाबदारी येते. एका युवा नेत्याची हत्या होत असताना त्याची बरोबरी तुम्ही श्वानाबरोबर कशी काय करता? दिल्लीश्वरांसमोर तुम्ही श्वानासारख्या शेपट्या हलविता, हे जनतेला समजलेले आहेच. पण राज्यात गुंडगिरी करा, खूनखराबा झाला तरी घाबरू नका… पण भाजपात आला तर सर्व विसरून जाऊ ही गुंडासाठी मोदी गॅरंटी आहे का? असे दिसत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader uddhav thackeray raise doubts over abhishek ghosalkar and mauris noronha firing slams home minister devendra fadnavis kvg