“श्वान गाडीखाली मेलं तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले. त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. तुम्ही अतिशय निर्ढावलेले, निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात. फडणवीस यांच्यासाठी मी याआधी फडतूस, कलंक असे शब्द वापरले होते. पण आता हे शब्दही तोकडे पडत आहेत. महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केली. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला होता. त्याला प्रत्युत्तर देत असताना फडणवीस म्हणाले होते की, गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील.
“गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे सर्वच प्राण्यांची आणि माणसांची जबाबदारी येते. एका युवा नेत्याची हत्या होत असताना त्याची बरोबरी तुम्ही श्वानाबरोबर कशी काय करता? दिल्लीश्वरांसमोर तुम्ही श्वानासारख्या शेपट्या हलविता, हे जनतेला समजलेले आहेच. पण राज्यात गुंडगिरी करा, खूनखराबा झाला तरी घाबरू नका… पण भाजपात आला तर सर्व विसरून जाऊ ही गुंडासाठी मोदी गॅरंटी आहे का? असे दिसत आहे”, असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केली.
अभिषेक घोसाळकरवर गोळ्या कुणी झाडल्या? उद्धव ठाकरेंचा घणाघाती आरोप; म्हणाले, “दोघांची सुपारी..
राज्यापालांनी मॉरिसचा सत्कार केला
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले. अभिषेक घोसाळकर प्रकरणात आम्ही राज्यपालांकडे जाणार नाहीत. कारण याआधीचे राज्यपाल जरा जास्तच कर्तव्यदक्ष होते. माजी राज्यपाल कोश्यारी यांचा मॉरिस या गुंडाचा एकत्र फोटो आहे. राज्यपालांच्या हस्ते अशा गुंडांचे सत्कार होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
“गाडीखाली एखाद्या श्वानाचा मृत्यू झाला तर…”, राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे विधान
भाजपाकडून राज्यात गुंडगिरी
उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यात मागच्या काही काळात घडलेल्या हिंसक घटनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “दीड वर्षांपूर्वी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत एका आमदाराने गोळीबार केला होता, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. कदाचीत त्याला क्लीन चीटही मिळाली असेल. बोरीवली मधील एका आमदाराच्या मुलाने बिल्डरच्या पुत्राचे अपहरण केले होते, त्याच्यावर कारवाई झाली नाही. ठाण्यात एका तरुणीवर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, पण आरोपी भाजपाचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. काल पुण्यात पत्रकार निखील वागळे, विश्वभंर चौधरी आणि वकील असीम सरोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला नियोजित असल्याचे दिसत आहे. पण पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्याऐवजी यांनाच बसवून ठेवले. भाजपाच्या पदाधिकाऱ्याने असा हल्ला करू, अशी धमकी देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही.”
रश्मी शुक्लांवर पत्र लिहिण्याची वेळ का आली?
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. मला आठवत नाही, आजवरच्या इतिहासात महासंचालकांवर पत्र लिहिण्याची वेळ आली असावी. शुक्ला यांच्याकडे माणुसकी शिल्लक असल्यामुळेच त्यांनी असे पत्र लिहिले असावे. कारण पोलिसांवर जनतेचा विश्वास राहिला नाही, असे त्यांना कळले असावे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मानसिक तपासणी करावी का? असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात जेव्हा एखादा अनुचित प्रकार घडतो, तेव्हा त्या खात्याच्या मंत्र्याला जबाबदार धरलं जातं. मंत्र्यांकडून कारभार नीट होत नसेल तर मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरलं जातं, पण मुख्यमंत्रीच गुंडाबरोबर फोटो काढण्यात व्यस्त आहेत. सरकारमध्ये एकमेकांकडे बोट दाखविण्याची हिंमत नाही.
राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा
पोलिसांना माझी नम्र विनंती आहे की, मी मुख्यमंत्री राहिलो आहे. माझ्या कार्यकाळात मी पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिलो. त्यांना जर मोकळा हात दिला तर ते २४ तासात गुंडाना तुरुंगात टाकतील. पण सरकार गुंडाच्या मागे उभे राहिले असेल तर हिंसाचार असाच कायम राहिल. मागच्या महिन्यात आम्ही जनता न्यायालय भरवून थोतांड समोर आणले होते. तसेच आज माध्यमांच्या माध्यमातून हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहे. राज्यातील घटनाबाह्य सरकारचा प्रशासनावर वचक राहिला नसून त्यांना कारभार करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला झापूनही काही उपयोग नाही. कारण हे सरकार शब्दांच्या माराच्या पुढे गेले आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली.