बारामती मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा आज (२४ मार्च) केली. विजय शिवतारे यांच्या या घोषणेमुळे बारामतीमध्ये लोकसभेला तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असले तरी अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. यातच विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढविण्याची घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून बारामतीची निवडणूक लढवू देण्याची विंनती विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत “हा विंचू अनेकांना डसला”, असा टोलाही लगावला.
विजय शिवतारे काय म्हणाले?
“हा विंचू अनेकांना डसला आहे, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर मोदींकडे जाऊन बसला. आता अडचण अशी झाली, चप्पल मारावी तर महादेवालाही लागतेय आणि विंचवालाही मारता येत नाही. ही लोकांची भावना असून विंचूच्या रुपात असलेल्या फक्त अजित पवारच नव्हे तर या दोन्ही (दोन्ही गट) शक्तींचा बिमोड करायला पाहिजे, असे माझे प्रामाणिक मत आहे”, अशा कडक शब्दात विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका केली.
हेही वाचा : बारामती लोकसभेबाबत विजय शिवतारेंची मोठी घोषणा, म्हणाले, “१२ तारखेला १२ वाजता…”
विजय शिवतारे यांनी फडणवीसांना केली ‘ही’ विंनती
“विजय शिवतारेंवर महायुतीच्या नेत्यांकडून दबाव येईल, मग ते निवडणुकीला उभे राहणार नाहीत, ते काहीतरी तडजोड करतील, असे अनेकांना वाटत होते. पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व नेत्यांना हात जोडून सांगतो, ही लढाई मला लढूद्या. ही धर्माची लढाई आहे, राजकारणाची स्वच्छता करायची असेल तर ही लढाई लढावीच लागेल”, असे विजय शिवतारे म्हणाले.
१२ तारखेला १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार
“कोणाला हरविण्यासाठी नाही तर घराणेशाही आणि झुंडशाही संपविण्यासाठी ही लढाई लढणार आहे. १ एप्रिल रोजी ५० ते ६० हजार लोकांची भव्य सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. माझ्याकडे कोणताही पक्ष नसून फक्त सर्वसामान्य जनता आहे. १२ तारखेला दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि या पाशवी शक्तीचे १२ वाजविणार”, असे विजय शिवतारे म्हणाले.