गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. बारामतीत नणंद-भावजय अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. आता बारामती मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीही अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बारामतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी बैठक घेत चर्चा केली होती. पण यानंतरही विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत आपण १ एप्रिलला प्रचाराला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली.

विजय शिवतारे काय म्हणाले?

“बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक मला फोन करत आहेत, ही लढाई लढण्यासाठी सांगत आहेत. विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिले आहेत, असा संभ्रम राष्ट्रवादीकडून तयार केला जात आहे. मी शरद पवारांचा हस्तक झालो आहे, असेही म्हणतात. सुनील तटकरे तर असे म्हणाले की, विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट वाचतोय. पण मी आज कार्यकर्त्यांना सांगतोय, आपण असा नीचपणा करणार नाही. आपण घराणेशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात लढत आहोत”, असे विजय शिवतारे म्हणाले.

हेही वाचा : वंचितने ठाकरे गटाबरोबरची युती तोडली, संजय राऊत म्हणाले; “बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे…”

पवार पर्व संपविण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात

“विजय शिवतारे जनतेची लढाई म्हणून या निवडणुकीत उतरला आहे. सर्वसामान्य माणसांचे एक नवीन पर्व सुरू करण्यासाठी ही लढाई लढत आहे. पवार पर्व संपविण्यासाठी ही लढाई सुरू आहे. पवार म्हणजे आडनाव नाही तर ही झुंडशाही, घराणेशाही आहे. ४० वर्ष आम्ही यांनाच का मतदान करायचे? हा प्रश्न मतदारसंघातील अनेकांनी मला विचारला. शरद पवार, अजित पवार यांनी आम्हाला काय दिले? पुणे जिल्ह्यात पवार कुटुंब सोडून दुसरा कोणी मोठा होऊ नये, म्हणून त्यांनी सर्वांचे पाय कापण्याचे प्रयत्न केले”, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली.

१ एप्रिलला प्रचाराला सुरुवात करणार?

“१ एप्रिल रोजी आम्ही प्रचाराला सुरुवात करत निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहोत. कोणाला हरविण्यासाठी नाही तर घराणेशाही आणि झुंडशाही संपविण्यासाठी ही लढाई लढणार आहोत. १ एप्रिलला माऊलींच्या पालखी तळावर कमीत कमी ५० ते ६० हजारांची मोठी सभा घेणार आहे. माझ्याकडे कोणताही पक्ष नाही, माझ्याकडे फक्त सर्वसामान्य जनता आहे. पाचही विधानसभा मतदारसंघात अशा सभा घेतल्या जातील. १२ तारखेला १२ वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि या पाशवी शक्तीचे १२ वाजविणार”, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.

शिवसेनेचा राजीनामा देणार का?

विजय शिवतारे हे अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी स्वत:च केली. याचवेळी शिवसेनेचा राजीनामा देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता विजय शिवतारे म्हणाले, “हा शुल्लक प्रश्न विचारू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यावर काही कारवाई घेऊ शकतात. पण त्यांना देखील माझा हेतू माहिती आहे. माझा हेतू सर्वांना पटलेला आहे. मी जनतेसाठी फासावर जायलाही तयार आहे”, असे विजय शिवतारे म्हणाले.

Story img Loader