धाराशिव : राज्यभर गाजलेल्या तुळजापूर देवस्थानच्या लाडू घोटाळ्यातील आरोपीला निलंबित न करता पुन्हा सेवेत घेतले. अनधिकृतपणे त्याच्याकडे महत्वाच्या विभागांचा पदभार दिला. एकाच व्यक्तीकडे अनेक विभागांचा कारभार अनधिकृतपणे सोपविण्यात आला. त्यामुळेच तुळजाभवानी मंदिरात अधिकार्यांच्या मनमानीमुळे भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब प्रकरणी शिपाई ते जनसंपर्क अधिकारी अशा बेकायदेशीर व भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याचा विषय विधानपरिषदेत गाजला. शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी बुधवारी लक्षवेधी सूचनेद्वारे या महत्वपूर्ण विषयाला वाचा फोडली.
हेही वाचा >>> सातारा:संतोष पोळ’ला खटल्यासाठी वकील नेमण्याची न्यायालयाची सूचना
विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दागिने मोजणीत मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब झाल्याबाबत महत्वपूर्ण सूचना मांडली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन सादर करणार आहेत. सभागृहात नियम 93 अन्वये सार्वजनिक महत्वाच्या विषयावर देत असलेली सूचना स्वीकृत व्हावी, असे निवेदन करत त्यांनी अनेक खळबळजनक मुद्दे विधानपरिषदेसमोर उपस्थित केले आहेत.
तुळजाभवानी मंदिर समितीकडून शिपाई असलेल्या नागेश शितोळे यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून बेकायदेशीर नियुक्ती केली आहे. शितोळे यांच्या बेबंदशाही कारभारामुळे शासकीय आणि महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित व्यक्तीला शिपाई, संगणक सहाय्यक, आस्थापना लिपीक ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिर संंस्थानच्या जनसंपर्क अधिकारी पदावर आर्हता डावलून बेकायदा पदोन्नती देण्यात आली. राज्यभर गाजलेल्या तुळजाभवानी देवस्थानच्या लाडू घोटाळ्यात संबंधित व्यक्तीविरूध्द सात दोषारोप सिध्द झाले आहेत, असे असतानाही त्याला कायमस्वरूपी निलंबित न करता, पुन्हा एकदा अनधिकृतपणे सेवेत रूजू करून महत्वाच्या विभागांचा पदभार त्याच्यावर सोपविण्यात आला असल्याचेही पोतनीस आणि शिंदे यांनी विधानपरिषदेच्या निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा >>> “उद्धव ठाकरे हे आता तमाशातले…”, गोपीचंद पडळकरांची खालच्या पातळीवर टीका
तुळजाभवानी मातेच्या तिजोरीतील १० मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब असल्याची धक्कादायक बाब १९ जुलै रोजी उघडकीस आली आहे. देवीच्या दागिन्यांच्या दुसर्या क्रमांकाच्या डब्यातील दागिने गायब झाले आहेत. नेमके हे दागिने केंव्हा गायब झाले, याची माहिती उपलब्ध नाही, असे पंच समितीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पंच समितीचा अहवाल न स्वीकारता पुन्हा एकदा पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही पोतनीस आणि शिंदे यांनी सभागृहाला सांगितले.
अनधिकृतपणे एकाच व्यक्तीकडे अनेक विभागांचा कारभार
एकाच व्यक्तीकडे अनेक विभागांचा कारभार अनधिकृतपणे देण्यात आला. संबंधित अधिकार्याच्या मनमानी कारभारामुळेच तुळजाभवानी मंदिरात दिवसेंदिवस भ्रष्ट कारभार बोकाळला आहे. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांच्या मोजणीत १० मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब असल्याचे समोर आले आहे. मंदिराचा शिपाई ते विद्यमान जनसंपर्क अधिकारी, असा बेकायदा प्रवास करताना हेतुपुरस्सर केलेल्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणीही सूचनेद्वारे आमदार पोतनीस आणि आमदार शिंदे यांनी केली आहे.