मुक्ताईनगरमध्ये झटका देणाऱ्या शिवसेनेचा भाजपाने माथेरानमध्ये वचपा काढला. माथेरान नगर पंचायतीमधील सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या गटातील उपनगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक आणि एका अस्वीकृत सदस्याने भाजपात प्रवेश केला होता. या दहाही जणांचं नगरसेवक पद जाणयाची चिन्हं आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दहा जणांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत आदेश काढले आहेत.

मे महिन्यात मुक्ताईनगरमध्ये भाजपाच्या दहा आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. स्थानिक राजकारणात हा भाजपाला मोठा झटका असल्याचं बोललं जात होतं. या घटनेची चर्चा होत असताना अवघ्या १२ तासांतच भाजपाने शिवसेनेला धक्का दिला. माथेरान नगर पंचायतीमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेला भाजपाने खिंडार पाडलं. शिवसेनेच्या उपनगराध्यक्षांसह १४ पैकी १० जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

संबंधित वृत्त- जशास तसं! मुक्ताईनगरचा वचपा काढला माथेरानमध्ये; शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

कोल्हापूरमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमांनंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, महिना उलटून गेला, तरी तशा कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. दहा नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये अस्वस्था निर्माण झाल्याचं दिसून येत होतं. दरम्यान, कारवाईबद्दल होत असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. ‘मातोश्री’वरून हालचाली झाल्यानंतर आदेश निघाल्याचं बोललं जात आहे.

भाजप प्रवेश केलेले माथेरान नगरपरिषदेचे 10 नगरसेवक

१) आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष
२) राकेश चौधरी, नगरसेवक
३) सोनम दाबेकर, नगरसेवक
४) प्रतिभा घावरे, नगरसेवक
५) सुषमा जाधव, नगरसेवक
६) प्रियांका कदम, नगरसेवक
७) ज्योती सोनवळे, नगरसेवक
८) संदीप कदम, नगरसेवक
९) चंद्रकांत जाधव, नगरसेवक
१०) रुपाली आखाडे, नगरसेवक

Story img Loader