शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशीही त्यांची ओळख होती. तसंच बाबर यांना पाणीदार आमदार असंही म्हटलं जात होतं. आज त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Latest News)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही अनिल बाबर यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहिली आहे तसंच बाबर कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं.अनिल बाबर हे २०१९ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. अनिल बाबर यांनी अपक्ष उभे असलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर चार वेळा आमदार झालेत. १९९०, १९९९, २०१४, २०१९ असे चार वेळा ते निवडून आले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो.
समाजकार्याचा वसा चालवणारा लोकप्रतिनिधी गमावला-एकनाथ शिंदे
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणतात की, आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात.
अनिल बाबर यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद-देवेंद्र फडणवीस
विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते चारवेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.