विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. आता विधान परिषदेचं १२ जुलै रोजी रोजी मतदान होणार आहे. तसेच त्याच दिवशी ५ वाजल्यानंतर मतमोजणी पार पडणार आहे. विधान परिषदेमधून निवृत्त झालेल्या आमदारांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा एक किस्सा सभागृहात सांगितला आहे.

आमदार अनिल परब काय म्हणाले?

“आमदार बाबाजानी दुर्राणी यांची बिर्यानी खाल्याशिवाय कधीही एकही आमचं अधिवेशन झालं नाही. खास त्या बिर्यानीची संपूर्ण कहाणी ऐकण्यासाठी आम्हाला एक दिवस आधी चर्चा करावी लागायची. उद्या कोणता बोकड येणार, त्यासाठी मसाला कोणता लागणार? हे सर्व ऐकून दुसऱ्या दिवशी बिर्यानी खाल्यानंतर छान वाटायचं. बाबाजानी दुर्राणी यांनी या सभागृहात सर्वांवर प्रेम केलं. परभणीत जातीय सलोखा राखण्याचं काम बाबाजानी दुर्राणी यांनी केलं”, असं आमदार अनिल परब म्हणाले.

हेही वाचा : “पेशंट म्हणून ससूनमध्ये जा”, अनिल देशमुखांच्या प्रश्नावर मुश्रीफ म्हणतात, “मी व्यायाम करून…”; विधानसभेत रंगली जुगलबंदी

दरम्यान, विधान परिषदेवर असणारे १५ सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये कपिल पाटील, विलास पोतनीस, मनीषा कायंदे, भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, रमेश पाटील, नीलय नाईक, महादेव जानकर, रामराव पाटील आणि वजाहत मिर्झा हे निवृत्त होत आहेत. यामध्ये निरंजन डावखरे, अनिल परब, किशोर दराडे हे पुन्हा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधून विधानपरिषदेत आले आहेत. तर प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. १२ जुलै रोजी रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.