गुवाहाटीतूनच शिंदे गटातून माघार घेतलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आली आहे. अवैध मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारी रोजी त्यांना अमरावतीच्या कार्यालयात बोलविण्यात आलं आहे. या नोटीशीनंतर टीव्ही ९ शी बोलताना नितीन देशमुख म्हणाले, “मालमत्तेबाबत १७ जानेवारी रोजी जबाब नोंदविण्याचे आदेश नोटिशीत देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी भावनाताई गवळी यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कलम ३५३ नुसार माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आता अमरावती येथून एसीबी कार्यालयाची नोटीस आली आहे. माझे म्हणणे मी त्यावेळी मांडेन.”
हे ही वाचा >> “…तर मी आमदारकीचा राजीनामा देतो”, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं विधान!
ईडीने नोटीस दिली तरी घाबरणार नाही
यावेळी नितीन देशमुख म्हणाले की, तक्रार कुणाची आहे, तक्रारदाराचं नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नोटीशीत दिलेलं नाही. आमदाराला नोटीस देताना तक्रारदाराचं साधं नाव देखील दिलेले नाही. १७ तारखेला अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन मीडियाला याबाबत माझी भूमिका स्पष्ट करेल. भास्कर जाधव अधिवेशनात बोलले, लगेच त्यांना नोटीस आली. मलाही आता नोटीस आली आहे. ईडीची नोटीस आली तरी मी घाबरणार नाही. माझ्याकडे चुकीची मालमत्ता नाही.
हे ही वाचा >> ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून पोलिसांना मारहाण, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
एसीबीच्या कार्यालयातून सांगितले की, वर संपर्क साधा
आपल्याला एसीबीच्या कार्यालयातून एक फोन आला होता. तुमची एसीबी कार्यालयात तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यामुळे एकदा वर जाऊन संपर्क साधावा. आता वर जाऊन म्हणजे नेमकं कुणाला भेटावं, हे मला आणि सर्वांनाच कळलेलं आहे. तरिही मी काही संपर्क करणार नाही. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे आणि राहणार, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.
कोण आहेत नितीन देशमुख?
नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. शिंदे यांच्यासोबत सूरतला गेल्यानंतर देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. प्रकृती खालावल्यामुळे नितीन देशमुख यांना सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते गुवाहाटीला पोहोचले. मात्र मधूनच काही कारणास्तव ते खासगी विमानाने महाराष्ट्रात आले. यावेळी ते खासगी विमान खुद्द एकनाथ शिंदे यांनीच दिले असल्याचेही सांगण्यात आले होते. तेव्हापासून नितीन देशमुख हे ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले आहेत.