Sanjay Shirsat big claim on NCP Ajit Pawar met Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर यंदा पार पडलेल्या लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार विरूद्ध शरद पवार असा सामना पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाची सरशी झाल्याचं दिसून आलं. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने चांगली मुसंडी मारली. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच आज अजित पवार व शरद पवार यांची भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे.
भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, याबद्दल विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, “ते शरद पवार आहेत. शरद पवार यांचा स्वभाव असा राहिला आहे की, त्यांनी कधीच एका पक्षाबरोबर बांधून राहिले नाहीत. त्यांनी अनेक वेळा काँग्रेस पक्ष सोडला आणि अनेक वेळा ते काँग्रेसबरोबर गेले. ज्या शिवसेनेबरोबर त्यांची आधी शत्रूता होती, त्यांना बरोबर घेऊन त्यांनी सरकार चालवलं… त्यामुळे अजित पवारांबरोबर जाण्याबद्दल त्यांना काही अडचण नाही.”
“लोक म्हणत असतात, पण असं होऊ शकतं की भविष्यात दोघं एकत्र येतील. शरद पवार, सुप्रिया सुळे या सगळ्यांना गेल्या महिन्याभरापासून पाहिलं तर यांच्यात चर्चा सुरू आहे असं वाटतं. त्यामुळे भविष्यात सर्व नेते एकत्र येतील असं वाटतं आणि ते एकत्र आलेही पाहिजेत. शरद पवारांचा वारस जर कोणी असेल तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे आहेत. त्यांना जर एकत्र आणलं तर पुन्हा राजकारणात वेगळी समीकरणं सुरू होतील”, असेही शिरसाट म्हणाले.
तुम्हाला वाटतं का दोन्ही नेते एकत्र आले पाहिजेत? यावर शिरसाट म्हणाले की, “ते एकत्र येतील ती काही मोठी गोष्ट नाही. ते पवार आहेत, कधीही एकत्र येऊ शकतात. एकत्र आले तर आम्हाला काही अडचणदेखील नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.” पुढे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची शक्यता आहे का? याबद्दल विचारले असता शिरसाट म्हणाले की, “आतापर्यंत तर नाही, भविष्यात काय होतंय ते पाहावे लागेल.”
अजित पवार-शरद पवारांची दिल्लीत भेट
शरद पवारांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी आज सहकुटुंब दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार व पक्षातील इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. याभेटीनंतर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.