सोलापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांना दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा, असे परखड मत शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित युवासेना मेळाव्यात सावंत बोलत होते. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही शिवसेनेबरोबर सत्तेत आहेत ना, तर मग शिवसेनेवर कशाला अन्याय करता ? आम्हांला सत्तेत बसायची सवयच नाही. शिवसेना तर विस्थापितांचा गट आहे. तसे कोणी अजमावून पाहू नये.

सरकारच्या अर्थसंकल्पातदेखील शिवसेनेला दुय्यम-तिय्यम स्थान मिळते. अर्थसंकल्पात ६०-६५ टक्के निधी राष्ट्रवादीला ,तर ३०-३५ टक्के निधी काँग्रेसला मिळतो. फक्त १६ टक्के एवढाच निधी शिवसेनेला मिळतो. त्यातही उच्च व तंत्रशिक्षण खाते शिवसेनेकडे असल्यामुळे दहा टक्के निधी वेतनातच खर्च होतो.

केवळ ६ टक्केच निधी विकास कामांसाठी शिवसेनेच्या वाटय़ाला येतो. राष्ट्रवादीचा सामान्य ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील सरकारकडून एकेक कोटीचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर बसून नाचतो, आम्ही शिवसैनिकांनी शिवभोजन थाळीवरच समाधान मानायचे. त्यातही पुन्हा बिले मिळण्यासाठी सहा सहा महिने वाट पाहायची, अशा शब्दांत सावंत यांनी खदखद जाहीरपणे प्रकट केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mla tanaji sawant express displeasure over congress ncp behavior zws