उड्डाणपूल व बाहय़वळण रस्त्याबाबत राज्य सरकार व महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नगरकरांची दिशाभूल केल्याचा आरोप करत व त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आज, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लाक्षणिक उपोषण केले. दुपारी सुरू केलेले उपोषण तीनच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
पुणे रस्त्यावर रोज अपघात होत असतानाही उड्डाणपुलाच्या कामाच्या ठेकेदाराला सत्ताधाऱ्यांच्या गुंडांनी पळवून लावले. उड्डाणपूल झाला नसला तरी त्याचे टोलनाके सुरूच आहेत. बाहय़वळण रस्त्यासाठी महापौरांनी १४ कोटी रुपये मंजूर झाल्याची भंपक घोषणा केली, कोठे आहे हा पैसा, एक पैसाही मिळाला नाही. पारगमनच्या वसुलीसाठी बाहय़वळण रस्ता होऊ दिला जात नाही, असा आरोप आ. अनिल राठोड यांनी या वेळी  केला. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचेही या वेळी भाषण झाले.
नगरसेवक संजय शेंडगे, दत्ता मुदगल, संजय चोपडा, गणेश कवडे, संजय चव्हाण, मनोज दुलम तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

Story img Loader