सूर्योदय परिवार व शिवसेनेच्या वतीने आयोजित संविधान जागरण अभियानांतर्गत सामान्यज्ञान परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी आलेल्या आदित्य ठाकरे यांना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेला ‘चरणस्पर्श’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. शनिवारी आदित्य ठाकरे भय्यू महाराजांच्या शेजारी बसले असताना कार्यक्रमात काहीशा उशिराने आलेल्या खासदार खैरे यांनी आधी भय्यू महाराजांना प्रणाम केला आणि नंतर आदित्य ठाकरे यांचे चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे लाजले आणि त्यांनी त्यांचे हात वरचे वर धरले. पण ठाकरे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीसमोर कमरेत वाकलेले खासदार खैरे यांची छायाचित्रे आज सोशल संकेतस्थळांवर झळकली आणि नव्या चर्चेला तोंड फुटले.
रविवारी दिवसभर खासदार खैरे यांनी वेगवेगळे कार्यक्रम केले. पण दिवसभर खासदार खैरे यांनी केलेला चरणस्पर्श हा चर्चेचा विषय होता. या अनुषंगाने त्यांना विचारले असता, ‘मी चरणस्पर्श केला नाही. हातात हात घेतला. तरीही त्यांचा ‘सन्मान’ करणे चूक कसे ठरेल? आज मी जो काही आहे, तो केवळ ठाकरे परिवारामुळे. सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी कोठून कुठपर्यंत नेले. त्यामुळे त्यांचा सन्मान केला आणि आजकाल ‘फेसबुक’वर कोण काय टाकतो, याची मी पर्वा करत नाही.’ असे खैरे म्हणाले.

Story img Loader