मुंबईचे बॉम्बचे विष आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्य़ात पोहोचले आहे. कागलमध्ये विकले जाणारे बॉम्ब कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या खुर्चीखाली फुटतील, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जिल्ह्य़ातील बॉम्ब विकणाऱ्या टोळीच्या प्रकरणावर हल्ला चढविला. देशाची शांतता, सुव्यवस्था आघाडी शासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे धोक्यात आली असतांना नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खमक्या पंतप्रधानाची देशाला गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराला कागल येथील गैबी चौकात जाहीर सभा आयोजित केली होती. सभेत खासदार राऊत यांनी राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, अजित पवार, नारायण राणे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्या टोळ्या महाराष्ट्रात राज्य करीत आहेत. पण त्यांचा पैशाचा माज आणि दादागिरी यापुढे चालू दिली जाणार नाही, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची शिरे कापून नेली तरी नामर्द सरकार काहीच कारवाई करीत नाही. मजबूत, राष्ट्राभिमानी सरकार आणायचे असून त्यासाठी मोदींसारखा खमका पंतप्रधान देशाला हवा आहे.
आघाडीच्या धर्मनिरपेक्षतेचा पर्दाफाश करतांना राऊत म्हणाले, मुस्लीम मतांचा अनुनय करण्यासाठी सोनिया गांधी इमाम बुखारींच्या दारात पदर पसरत आहेत. ईशरत जहाँसार या आरोपीला निर्दोष ठरविण्यासाठी शरद पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. यालाच पुरोगामी विचार म्हणायचे काय, असा सवाल उपस्थित करून शिवसेना हाच खरा देशातील निधर्मवादी पक्ष असल्याचे स्पष्ट केले.
महागाई आणि भ्रष्टाचाराने लोकांचे जगणे मुश्किल बनले आहे. काँग्रेसी शासनाचा तिटकारा आल्याने लोकसभा निवडणुकीत जनता आघाडी सरकारला नाकारून मोदींना देशाचा पंतप्रधान बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, राजेखान जमादार, अमरिश घाटगे,अल्ताफ मुजावर, सात्तापा सोनाळकर यांची भाषणे झाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे,सुषमा चव्हाण आदी उपस्थित होते.
कागलमधील बॉम्ब मुश्रीफ यांच्या खुर्चीखाली फुटतील – राऊत
मुंबईचे बॉम्बचे विष आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्य़ात पोहोचले आहे. कागलमध्ये विकले जाणारे बॉम्ब कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या खुर्चीखाली फुटतील, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जिल्ह्य़ातील बॉम्ब विकणाऱ्या टोळीच्या प्रकरणावर हल्ला चढविला.
आणखी वाचा
First published on: 09-04-2014 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp sanjay raut criticized mushrif