विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक विषयांवरून आमने-सामने आले आहेत. महागाई, बेरोजगारी यासह अनेक मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला. यावर आज भारतीय जनता पार्टीकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे.

यासंदर्भात अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी, तसेच अंबादास दानवेंचं निलंबन करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गोंधळावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “भाजपाच्या टोळ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी अंबादास दानवे यांची पाठराखण केली आहे.

हेही वाचा : “..तर लाडांना चांगलाच ‘प्रसाद’ दिला असता”, अंबादास दानवे विधानपरिषदेतल्या राड्यानंतर पुन्हा आक्रमक

संजय राऊत काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून राज्याची सूत्र गेली आहेत. तेव्हापासून त्यांनी ज्या भारतीय जनता पक्षाची झालर टाकून टोळ्या बनवल्या आहेत. त्या टोळ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळले आहेत. पण आमच्या अंगावर कोणी येत असेल तर शिवसैनिक म्हणून आम्हाला त्यांच्यावर त्या पद्धतीने चाल करावी लागेल. या सर्व लोकांना हिंदुत्व काय माहिती? हे सर्व लोक देवेंद्र फडणवीसांनी गोळा केलेले आहेत. जे दिल्लीमध्ये आहे तेच महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेला एकही माणूस हा खऱ्या भारतीय जनता पक्षाचा नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

विधानपरिषदेतील गोंधळावर दानवे काय म्हणाले?

“भारतीय जनता पार्टीने आम्हाला नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींना आणि १५० खासदारांना संसदेमधून निलंबित केलं होतं. त्यामुळे भाजपाने संसदीय भाषा आणि नियम, कायदे उद्धव ठाकरे यांना आणि मला शिकवण्याची गरज नाही. प्रसाद लाड हे राजकारणात नवीन आहेत.मला वाटतं या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करून काय होणार? त्यांनी न्यायालयात जावं. आता त्यांना काय करायचं ते करुद्या. कारण त्यांना कायदे आणि संविधान आता आठवायला लागले आहेत. आतापर्यंत भाजपाला कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहांगिरी किंवा त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. पण आता त्यांना कायद्याची जाणीव झाली हे चांगलं आहे”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.