शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी आज (२७ मार्च) जाहीर केली. यामध्ये १७ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, शिवसेना ठाकरे गट २२ जागांवर निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहे. यापैकी १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सांगलीमधून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू होती. तसेच या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस वाढली होती.
गेले अनेक दिवस सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नव्हता. अखेर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत कोणत्या जागांचा तिढा आहे का? सांगलीच्या जागेचा तिढा होता का? यासह ठाकरे गटाची उमेदवारांची दुसरी यादी कधी जाहीर होईल, अशा विविध विषयांवर भाष्य केले आहे.
हेही वाचा : लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, राजन विचारे, चंद्रहार पाटील यांना संधी
संजय राऊत काय म्हणाले?
“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या १७ उमेदवारांची घोषणा आज करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाने १७ नावे जाहीर केली आहेत. अजून पाच नावे दोन दिवसांमध्ये जाहीर केली जातील. यामध्ये पालघर, कल्याण-डोंबिवली, हातकणंगले यासह अजून काही मतदारसंघाचे उमेदवार लवकरच जाहीर होतील. यामध्ये हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितला आहे. हातकणंगलेची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र, याबाबत आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण निर्णय घेणार आहोत”, असे संजय राऊत म्हणाले.
सांगलीच्या जागेचा तिढा होता का?
“शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती. या जागेचा तिढा सुटत नसल्याचे बोलले जात होते. अखेर यावर संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीत कोणत्याही जागेचा तिढा नाही. शिवसेनेने आज उमेदवारांची घोषणा केली, त्या अर्थी आमच्यात कोठेही कोणताही तिढा नाही. रामटेकदेखील आमची जागा होती. पण त्या जागेवर काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामध्ये आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे कोणताही तिढा नाही आणि नव्हता”, असे संजय राऊत यांनी सांगितले.